सुरक्षारक्षकांनीच मारला सोने, चांदीवर डल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सिकेरीतील काश्मिर हाऊसमधून लाखोंच्या वस्तू लंपास

Story: गोवन वार्ता । प्रतिनिधी |
2 hours ago
सुरक्षारक्षकांनीच मारला सोने, चांदीवर डल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

म्हापसा : सिकेरी, कांदोळी येथील प्रसिद्ध काश्मीर हाऊसच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सहा सुरक्षारक्षकांनीच संगनमताने लाखो रुपयांच्या सोने, चांदी व रत्नजडित मौल्यवान वस्तूंची अफरातफर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी मेसर्स जीफोरएस सिक्युअर सोल्यूशन (इंडिया) प्रा. लि. या कंपनीच्या सहा सुरक्षारक्षकांविरोधात विश्वासघात आणि अफरातफरीचा गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे.अर्घ्य दलाई, संदीप प्रधान, अतनू जाना, राजेंद्र मैती, रिंटू नायक आणि अपूर्व दास अशी संशयितांची नावे आहेत. १७ मार्च ते १९ मे २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी रोहिना मेहरा (रा. गुरुग्राम, हरियाणा) यांनी ४ ऑगस्ट रोजी कळंगुट पोलिसांत तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, संबंधित कालावधीत काश्मीर हाऊसच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आणि बंगल्याच्या चाव्या संशयित सुरक्षारक्षकांकडे होत्या. या विश्वासाचा गैरफायदा घेत त्यांनी संगनमताने बंगल्यातील मौल्यवान वस्तू लंपास केल्या.
या प्रकरणी कळंगुट पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(३) आणि ३(५) अन्वये विश्वासघात व अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व सहा संशयितांचा शोध सुरू असून पोलीस उपनिरीक्षक परेश सिनारी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
९६२ चांदीच्या वस्तू, ६८२ दागिने गायब
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, बंगल्यातून ९६२ चांदीच्या वस्तू चोरीला गेल्या. त्यामध्ये कटोरे, कॉफी पॉट, वाईन कप, फोटो फ्रेम, कंदील, ट्रे, हुक्का, नृत्यांगनेच्या मूर्ती, इत्तराच्या बाटल्या, फ्लॉवर वॉस, शंख, उंटाच्या मूर्ती, जाळी बॉक्स आणि लोट्यांचा समावेश आहे. याशिवाय मौल्यवान खड्यांचे पेंडंट, कानातील दागिने, हार, ब्रेसलेट, बांगड्या, अंगठ्या, ब्रोच, पैंजण, सोनसाखळ्या, कफलिंक्स आदी तब्बल ६८२ प्रकारचे सोन्या-चांदीचे व रत्नजडित दागिने तसेच मौल्यवान काश्मीरी सिल्क-वुलन कार्पेटही चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.            

हेही वाचा
सर्व पहा