‘गृह आधार’ मानधनवाढीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

महिला व बाल विकास खात्याची माहिती


4 hours ago
‘गृह आधार’ मानधनवाढीचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मानधनात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. मानधनवाढीचा प्रस्ताव महिला व बाल विकास खात्याने सरकारकडे पाठवला असून, हा प्रस्ताव सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे, अशी माहिती महिला व बाल विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘गृह आधार’ योजनेच्या मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी महिला व बाल विकास खात्याने मानधनवाढीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे.
राज्यात सध्या सुमारे २ लाख महिलांना ‘गृह आधार’ योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपये मानधन मिळते. या मानधनात आता वाढ करण्यात येणार आहे. मात्र, मानधनात किती वाढ करायची, याचा निर्णय सरकारच्या पातळीवर होणार असल्याने सध्या किती वाढ केली जाईल, हे सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून त्याची फाईल महिला व बाल विकास मंत्री विश्वजीत राणे यांच्या माध्यमातून वित्त खात्याकडे पाठवण्यात आली आहे. ही फाईल अद्याप महिला व बाल विकास खात्याकडे परत आलेली नाही. वित्त खात्याची मंजुरी मिळाल्यानंतर मानधनवाढीची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल, असेही अधिकाऱ्याने स्पष्ट केले.