पणजी : बार्देश तालुक्यातील मूळ कर्नाटकातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला मातृत्वास भाग पाडल्याप्रकरणी पणजी महिला पोलिसांनी १९ वर्षीय युवकाला अटक केली आहे. संशयिताला म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
जून महिन्यात अल्पवयीन मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान १३ जून २०२६ रोजी तिने बाळाला जन्म दिला. मुलगी अल्पवयीन असल्याने रुग्णालय प्रशासनाने याची माहिती बार्देश पोलिसांना दिली. त्यानंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी पीडित मुलगी आणि तिच्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले. मात्र, मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या आदेशानुसार पीडित मुलगी आणि नवजात बाळाला संरक्षणासाठी मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये ठेवण्यात आले. तसेच कुटुंबीयांशी संपर्कावरही निर्बंध घालण्यात आले. याविरोधात पीडितेच्या आईने गोवा खंडपीठात याचिका दाखल करून मुलगी व बाळाचा ताबा देण्याची मागणी केली. हे प्रकरण पुढे पणजी महिला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.
दरम्यान, अटक केलेल्या युवकाला मंगळवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, गुरुवारी पुढील कोठडीसाठी त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
डीएनए तपासानंतर संशयिताची पटली ओळख
तपासादरम्यान पीडित मुलगी, बाळ आणि कुटुंबातील एका सदस्याचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. हा अहवाल निष्फळ ठरल्यानंतर मुलीच्या परिचयातील चार संशयितांचे रक्तनमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. दरम्यान, पीडित मुलीची पुन्हा चौकशी करण्यात आली असता तिने रक्तनमुने घेतलेल्या संशयितांपैकी एका युवकाची ओळख पटवून दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित १९ वर्षीय युवकाला अटक केली.


