मडगावात एफडीएची कारवाई, अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेला ७० हजारांचा अन्नसाठा जप्त करून नष्ट

मडगाव बसस्थानक व एसजीपीडीए परिसरात अन्न आणि औषध प्रशासनाने पहाटे धाड टाकून नियमबाह्य वाहतूक आणि अयोग्य साठवणूक केलेला ७० हजार रुपयांचा पनीर, टोफू, मिठाईचा साठा जप्त करून जागीच नष्ट केला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
2 hours ago
मडगावात एफडीएची कारवाई, अयोग्य पद्धतीने साठवणूक केलेला ७० हजारांचा अन्नसाठा जप्त करून नष्ट

 मडगाव : दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) भल्या पहाटे धडक तपासणी मोहीम राबवून अयोग्य साठवणूक केलेले आणि अन्न सुरक्षेचे नियम डावलून वाहतूक केले जाणारे सुमारे ७० हजार रुपये किमतीचे पनीर, टोफू (सोया पनीर) आणि मिठाई जप्त करून जागीच नष्ट केली आहे. मडगाव येथील प्रसिद्ध कदंब बसस्थानक आणि एसजीपीडीए (SGPDA) मार्केट परिसरात ही विशेष कारवाई करण्यात आली.

आंतरराज्य बसगाड्यांमधून होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या असुरक्षित वाहतुकीवर चाप लावण्यासाठी एफडीएच्या सासष्टी तालुक्यातील अधिकाऱ्यांनी बुधवारी पहाटे चार वाजल्यापासूनच अचानक तपासणी मोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान एका 'इको' वाहनाची तपासणी केली असता, त्यात अयोग्य पद्धतीने साठवून ठेवलेला टोफूचा मोठा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, या टोफूच्या पाकिटांवर 'नमकीन' असे चुकीचे लेबल लावले होते आणि त्यावर अन्न सुरक्षा कायद्यानुसार आवश्यक असणारी कोणतीही माहिती छापलेली नव्हती. अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएने ४० हजार रुपये किमतीची टोफूची १०० पाकिटे तत्काळ जप्त केली.

त्याचप्रमाणे, कोल्हापूरहून मडगाव येथील दोन व्यापाऱ्यांसाठी आणलेल्या एका आंतरराज्य बसचीही एफडीए पथकाने कसून पडताळणी केली. या बसमधून योग्य तापमान न राखता आणलेले ३०,४०० रुपये किमतीचे ८० किलो पनीर, तसेच लेबल नसलेली सुमारे ८ किलो बिस्किटे आणि मिठाई जप्त करण्यात आली. हे सर्व खाद्यपदार्थ अतिशय नाशवंत असून ते ग्राहकांच्या आरोग्यास गंभीर धोका पोहोचवणारे असल्याने एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या सर्व जप्त साठ्याची घटनास्थळीच विल्हेवाट लावून तो नष्ट केला.

ही संपूर्ण कारवाई अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकारी संज्योत कुडाळकर यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव कवळेकर, प्रिया देसाई यांच्यासह अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप गावडे, अभिषेक नाईक, एमटीएस गौरेश गावकर आणि वाहन चालक दुमीन गोन्साल्विस यांनी सहभाग घेतला होता. एफडीएच्या या धडक कारवाईमुळे निष्काळजीपणे खाद्यपदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा
सर्व पहा