गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी : नोकरी किंवा उच्च शिक्षणासाठी अनेक गोमंतकीय विदेशात जातात. विदेश व्यवहार मंत्रालयाकडून व्यक्तीगत, शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रमाणपत्रांना मान्यता देण्यापूर्वी राज्य सरकारकडून ही प्रमाणपत्रे प्रमाणित करून घ्यावी लागतात. ही प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी सरकारने मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करून संबंधित अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
उच्च माध्यमिक शिक्षणाची सर्व प्रमाणपत्रे शिक्षण संचालक प्रमाणित करतील. तांत्रिक शिक्षण तसेच व्यावसायिक महाविद्यालयांच्या पदवीची प्रमाणपत्रे तांत्रिक शिक्षण संचालक प्रमाणित करतील. बिगर-व्यावसायिक पदवी आणि इतर सर्व पदव्यांची प्रमाणपत्रे उच्च शिक्षण संचालक प्रमाणित करतील. कौशल्य आणि कारागिरी संचालनालयाच्या अखत्यारित येणारी प्रमाणपत्रे कौशल्य विकास संचालनालयाचे संचालक प्रमाणित करतील. रहिवासी तसेच इतर प्रमाणपत्रे अवर सचिव (गृह) प्रमाणित करतील. यासाठी संबंधित खात्यांच्या प्रमुखांनी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांची नोंद प्रमाणपत्रे प्रमाणित करणाऱ्या अधिकाऱ्यांकडे करणे आवश्यक आहे. तसेच कायद्यानुसार नियुक्त करण्यात आलेल्या नोटरींच्या स्वाक्षऱ्यांची नोंदणीही करणे बंधनकारक आहे.
गोव्यातील अनेक नागरिक आखाती तसेच इतर देशांमध्ये नोकरीसाठी जातात. पासपोर्ट कार्यालयाकडून प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यापूर्वी ती राज्यातील संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. कोणते प्रमाणपत्र कोणत्या अधिकाऱ्याने प्रमाणित करावे, याबाबतही संभ्रम होता. त्यामुळे उमेदवारांना विविध अधिकाऱ्यांकडे वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. आता प्रमाणपत्रे प्रमाणित करण्यासाठी सरकारने संबंधित अधिकारी निश्चित केले आहेत. यासंदर्भातील अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. त्यामुळे विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


