गोव्यात लवकरच होणार राज्य क्रीडा स्पर्धा

क्रीडा मंत्र्यांच्या उपस्थितीत गोवा ऑलिम्पिक असोसिएशनची बैठक

Story: गोवन वार्ता । न्यूज डेस्क |
02nd September, 11:19 pm
गोव्यात लवकरच होणार राज्य क्रीडा स्पर्धा

पणजी : राज्यात क्रीडा संस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी गोव्यात लवकरच पहिल्यावहिल्या ‘राज्य क्रीडा स्पर्धा’ आयोजित करण्यात येण्याची शक्यता आहे. याशिवाय, राज्यातील विविध भागांत क्रीडा शाळा सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावावरही चर्चा झाली. पर्वरी येथील सचिवालयात गोवा ऑलिम्पिक असोसिएशनच्या (जीओए) कार्यकारी समितीची एक उच्चस्तरीय बैठक अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली आणि क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत गोव्याच्या आगामी क्रीडा विकासाच्या रोडमॅपवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या नियोजित राज्य क्रीडा स्पर्धा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या धर्तीवर आयोजित केल्या जाऊ शकतात, जिथे गोव्यातील अव्वल संघ किंवा क्लब विविध क्रीडा प्रकारांमध्ये आपापसात स्पर्धा करतील. जीओएचे सरचिटणीस संदीप हेबळे यांनी सांगितले की, या स्पर्धांच्या माध्यमातून गोव्यातील सर्वोत्तम खेळाडूंना एक मोठे स्पर्धात्मक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे.
क्रीडा मंत्री रमेश तावडकर यांनी गोव्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ३ ते ४ क्रीडा शाळा सुरू करण्याची आपली दूरदृष्टी मांडली. अशा शाळांमुळे तरुण खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना योग्य आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी प. बंगाल व देशाच्या इतर भागांप्रमाणे ऑलिम्पिक खेळांमध्ये गुणवान खेळाडू तयार करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेवर भर दिला. तसेच गोव्यातील ग्रामीण भागांत आणि शाळांमध्ये प्रतिभेची कोणतीही कमतरता नसून शारीरिक शिक्षण शिक्षकांनी यात महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीत खेळाडू आणि प्रशिक्षकांना मिळणाऱ्या सुविधांवर विशेष भर देण्यात आला. क्रीडा प्राधिकरणाच्या प्रशिक्षकांसाठी पुनश्चर्या वर्ग आयोजित करणे आणि क्रीडा संघटनांच्या समन्वयातून त्यांचा प्रभावी वापर करण्याची सूचना जीओएचे सहचिटणीस मनोज पाटील यांनी केली. तर उपाध्यक्ष कैतानो फर्नांडिस यांनी क्रीडा क्षेत्राचा पाया मजबूत करण्यासाठी व्यावसायिक प्रशासकीय सेटअप जोडण्याची गरज व्यक्त केली.
ऑलिम्पिक भवन उभारणार
खजिनदार जयेश नाईक यांनी ऑलिम्पिक भवन आणि जीओएच्या नवीन कार्यालयाच्या नियोजनाची माहिती मंत्र्यांना दिली. याशिवाय, क्रीडा प्रणाली अधिक प्रभावी बनवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावरही सहमती दर्शवण्यात आली. या बैठकीत जीओएचे उपाध्यक्ष सुदेश ठाकूर, संध्या पालेकर, भाग्यश्री पडलोस्कर, तसेच कार्यकारी समितीचे सदस्य अभय भामईकर आणि विप्लवा भक्त आदी पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी क्रीडा स्पर्धा, तळागाळातील खेळाडूंचा शोध, आधुनिक प्रशिक्षण आणि मजबूत प्रशासन या सर्व मुद्द्यांचा समावेश असलेला एक सर्वसमावेशक क्रीडा आराखडा तयार करण्यात आला.

हेही वाचा
सर्व पहा