मडगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) दक्षिण गोवा पथकाने खाद्यपदार्थांची वाहतुकीसह उत्पादन केंद्रांची तपासणी सुरू केली आहे. मडगाव, केपे आणि धारबांदोडा येथे केलेल्या कारवाईत नियमबाह्य सुमारे ४३० किलो खाद्यसाठा आढळून आला. या साठ्याची किंमत सुमारे ८५ हजार ८८० रुपये असून, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी हा खाद्यसाठा नष्ट करण्यात आला.
मडगाव कदंब बसस्थानकावर गुरुवारी सकाळी एका आंतरराज्य बसच्या तपासणीत लोणचे, स्टोन चॉकलेट, हिंग गोळी, पान व गोड आवळा असे सुमारे २३ किलो खाद्यपदार्थ आढळले. या पदार्थांवर नियमांनुसार आवश्यक लेबल माहिती नव्हती. या साठ्याची किंमत सुमारे ८ हजार रुपये होती. याच बसमध्ये सुमारे ९ हजारांचे ३० किलो बटाटा चिप्सही आढळले. त्या पाकिटांवरही उत्पादन माहिती, अंतिम वापर तारीख आणि अन्न सुरक्षा परवाना क्रमांक नमूद नव्हता. तसेच पुण्याहून आणलेल्या सुमारे १२ हजारांच्या २०० किलो आइस क्युबच्या लेबलवरही चुकीची माहिती आढळली. यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने स्पष्ट केले.
कलाकंद, माव्यात रंगाचा वापर
केपे तालुक्यातील शिरवई येथील खाद्यपदार्थ युनिटमध्ये ४५ हजार रुपये किमतीचा १५० किलो कलाकंद आढळला. त्यावर आवश्यक लेबल माहिती, तुकडी क्रमांक आणि वापरण्याची अंतिम तारीख नव्हती. तसेच कलाकंदमध्ये हिरवा रंग मिसळण्यात आल्याचेही आढळून आले. शेल्डे, केपे येथील युनिटमध्ये ११ हजार ८८० रुपये किमतीचा २७ किलो मावा आढळला. त्यावरही आवश्यक माहिती व अन्न सुरक्षा परवाना क्रमांक नव्हता आणि त्यात रंग मिसळण्यात आल्याचे निदर्शनास आले.
धारबांदोड्यात तपासणीसाठी घेतले १५ नमुने
धारबांदोडा तालुक्यात अन्न सुरक्षा अधिकार्यांनी विविध मिठाई विक्री व उत्पादन केंद्रांची तपासणी करून १५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एफडीएने ही कारवाई अधिक तीव्र केली आहे. या मोहिमेत अन्न व औषध खात्याच्या नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी माधव व प्रिया, अन्न सुरक्षा अधिकारी अमरदीप, अभिषेक व प्रिया तसेच बहुउद्देशीय कर्मचारी गौरेश यांनी सहभाग घेतला.


