अत्याचार, अपघातग्रस्तांना १० लाखांपर्यंत नुकसान भरपाई

कायदा सेवा प्राधिकरणाकडे अर्जांची जबाबदारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
10th September, 10:38 pm
अत्याचार, अपघातग्रस्तांना १० लाखांपर्यंत नुकसान भरपाई

अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीची मुले अल्पवयीन असल्यास त्यांना २ लाख रुपये, तर अपघातात अवयव निकामी झाल्यास ५० हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. तसेच अॅसिड हल्ल्यातील पीडितांना ३.५ ते ५ लाख, जमावाच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास ५० हजार ते २ लाख आणि लैंगिक अत्याचारामुळे महिला किंवा मुलाला मानसिक त्रास झाल्यास १० लाखांपर्यंत नुकसानभरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

नुकसानभरपाईसाठी आता कायदा सेवा प्राधिकरणाकडे अर्ज
  • अपघाती मृत्यू झालेल्या व्यक्तीची मुले अल्पवयीन असल्यास : २ लाख रुपये
  • अपघातात अवयव निकामी झाल्यास : ५० हजार रुपये
  • अॅसिड हल्ल्यातील पीडित : ३.५ ते ५ लाख रुपये
  • जमावाच्या हल्ल्यात जखमी किंवा मृत्यू झाल्यास : ५० हजार ते २ लाख रुपये
  • लैंगिक अत्याचारामुळे महिला किंवा मुलाला मानसिक त्रास झाल्यास : १० लाखांपर्यंत

जिल्हाधिकाऱ्यांऐवजी प्राधिकरणाकडे अर्ज

ही भरपाई मिळवण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांऐवजी ‘कायदा सेवा प्राधिकरणाकडे’ अर्ज करावा लागणार आहे. कायद्याच्या कलम ३९६ अंतर्गत न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिल्यानंतर पीडित व्यक्तीला या भरपाईसाठी प्राधिकरणाकडे रीतसर अर्ज करावा लागेल.

अर्जासोबत जोडलेल्या आवश्यक कागदपत्रांची छाननी आणि कायदेशीर तपासणी केल्यानंतरच नुकसानभरपाईबाबतचा अंतिम निर्णय प्राधिकरण घेईल. तसेच, इतर कोणत्याही योजनेअंतर्गत पीडितेला आधीच नुकसानभरपाई मिळाली असल्यास तो अर्ज फेटाळण्याचा अधिकारही कायदा सेवा प्राधिकरणाला राहणार आहे.

२०१२ पासून लागू होती योजना

गोवा पीडित नुकसानभरपाई योजना ही राज्यामध्ये सर्वप्रथम २०१२ या वर्षी लागू करण्यात आली होती. पूर्वी या योजनेअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केल्यानंतर राज्य सरकारकडून भरपाईबाबतचा अंतिम निर्णय घेतला जात होता.

योजनेची संपूर्ण जबाबदारी कायदा सेवा प्राधिकरणाकडे

आता काळानुसार या मूळ योजनेत महत्त्वपूर्ण बदल करून सुधारित योजना नव्याने लागू करण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेची संपूर्ण जबाबदारी आता कायदा सेवा प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली आहे, असे राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.

हेही वाचा
सर्व पहा