‘माझी बस’ योजनेअंतर्गत बसमालकांच्या अनुदानात वाढ

अनुदान ३ रुपये प्रति किलोमीटरवरून ५ रुपये प्रति किलोमीटर

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
10th September, 11:52 pm
‘माझी बस’ योजनेअंतर्गत बसमालकांच्या अनुदानात वाढ

पणजी : वाहतूक खात्याने ‘माझी बस’ योजना नव्याने अधिसूचित केली आहे. याआधी योजने अंतर्गत बस चालकांना ३ रुपये प्रति किलोमीटर अनुदान दिले जात होते. आता ते वाढवून ५ रुपये प्रति किलोमीटर करण्यात आले आहे. खात्यातर्फे बसच्या विम्यासाठी यापूर्वी ३० हजार रुपये देण्यात येत होते. त्यात वाढ करून ते ४० हजार रुपये करण्यात आले आहेत. याशिवाय १५ वर्षांपूर्वीची बस बदलण्यासाठी १० लाख रुपये अनुदान व तिकीट शुल्कातून जमा झालेली सर्व रक्कम योजनेच्या लाभार्थ्यांची असेल, हे दोन नियम पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात आले आहेत.

राज्यात सुरक्षित, माफक दरातील आणि भरवशाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी खाजगी बस ऑपरेटना आर्थिक मदत देणे हा या योजनेचा उद्देश आहे. तसेच राज्यात बसची संख्या वाढवणे, रहदारी कमी करणे आणि ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था प्रभावी करणे या हेतूसाठी देखील योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑपरेटरकडे आवश्यक ते सर्व परवाने असणे गरजेचे आहे. योजने अंतर्गत वापरण्यात येणाऱ्या बस १५ वर्षांपेक्षा जुन्या नसाव्यात. सुरुवातीला ३ वर्षे २० वर्षे जुन्या बस वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

लाभार्थी गोव्यातील नोंदणीकृत बस ऑपरेटर असणे आवश्यक आहे. त्याने योजनेतील सुरक्षा, सेवा ब्रॅण्डिंग विषयक सर्व अटी मान्य करणे गरजेचे आहे. बसचे फिटनेस प्रमाणपत्र, रस्ता कर भरला असणे आवश्यक आहे. योजने अंतर्गत बस महिनाभर ऑपरेट होणे गरजेचे आहे. दुरुस्ती करता शनिवार, रविवार अथवा सुट्टीचा दिवस निवडावा लागणार आहे. बस बंद असली तर त्याऐवजी दुसरी बस चालवावी लागेल. याची माहिती खात्याला देखील द्यावी लागणार आहे. बसमध्ये गणवेशातील चालक व ऑटोमेटिक तिकीट मशीन असणे आवश्यक आहे. 

हेही वाचा
सर्व पहा