लोकांचा कल भाजपकडे, कोणत्याही आघाडीचा फरक नाही

दामू नाईक : फातोर्डा मतदारसंघात ‘कमळ’ फुलवणारच

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
just now
लोकांचा कल भाजपकडे, कोणत्याही आघाडीचा फरक नाही

मडगाव :
आम आदमी पक्ष, गोवा फॉरवर्ड किंवा इतर पक्ष एकत्र येत असले तरी भाजपला त्याचा कोणताही फरक पडणार नाही. मागील चार-पाच निवडणुकांमध्ये जनतेचा कल भाजपकडे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ज्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आहे, त्यांनाच तिसऱ्या आघाडीची गरज भासते, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केला. फातोर्डा मतदारसंघात कमळ फुलवणारच, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राज्यात सुरू असलेल्या तिसऱ्या आघाडीच्या चर्चेबाबत नाईक म्हणाले, भाजपचे काम जनसंघाच्या काळापासून सुरू आहे. दोन खासदारांपासून सुरुवात केलेला पक्ष आज मोठा राष्ट्रीय पक्ष बनला आहे. तळागाळात सातत्याने काम करून पक्षाचा विस्तार करण्यात आला असून, भाजप एका रात्रीत उभा राहिलेला पक्ष नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीच्या चर्चेवर भाष्य करण्याची गरज नाही. मागील निवडणुकीत तृणमूल काँग्रेस, सेव्ह गोवा आणि यूजीडीपीसारखे पक्ष आले; मात्र आज त्यांची स्थिती काय आहे, असा सवाल त्यांनी केला. असे पक्ष येतात आणि जातात; भाजप मात्र लोकांमध्ये राहून काम करत असल्याने कोणतीही आघाडी आली तरी पक्षाला फरक पडणार नाही, असे ते म्हणाले.
भाजप हा राष्ट्रीय पक्ष असला तरी गोयकारपणाचा विचार करूनच राज्यात पक्षाचे काम सुरू आहे. तिकीट कुणाला द्यायचे, हा निर्णय पक्षाचा असतो. उमेदवाराचे सामाजिक कार्य, जनसंपर्क आणि अन्य बाबींचा सखोल अभ्यास करूनच उमेदवाराची निवड केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजप-मगो युती यापुढेही कायम
समान विचारधारा असलेल्या पक्षांसोबत भाजपची युती कायम राहणार आहे. मगो आणि भाजपची विचारधारा समान असल्याने दोन्ही पक्षांची युती यापुढेही कायम राहील. युतीसंदर्भातील चर्चा योग्य वेळी होईल; मात्र सध्या कोणतीही चर्चा झालेली नाही. विधानसभा निवडणुकीला अद्याप पाच महिने असल्याचे सांगत, सध्या गणेश चतुर्थीच्या काळात राजकारण बाजूला ठेवून समाज आणि कुटुंबातील एकोपा साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
फातोर्ड्यात कॉस्मेटिक नव्हे, प्रत्यक्ष विकास हवा
फातोर्डा मतदारसंघात कमळ फुलवणे हे आपले ध्येय असल्याचे नाईक यांनी सांगितले. पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाल्याने फातोर्डा मतदारसंघ सहजरीत्या कुणाला मिळू देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. २००२ पासून मतदारसंघात झालेल्या विकासकामांचा लेखाजोखा आणि त्यासंबंधीची कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. विकास केवळ कॉस्मेटिक स्वरूपाचा न राहता प्रत्यक्षात दिसला पाहिजे, हीच आपली भूमिका आहे. फातोर्डा मतदारसंघात यावेळी कमळ फुलणारच, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.      

हेही वाचा
सर्व पहा