म्हापसा : जमीन हडप प्रकरणातील मुख्य सूत्रधार सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्याविरोधात सक्त वसूली संचालनालयाच्या (ईडी) गोवा (पणजी) विभागाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार मेरशी येथील उत्तर गोवा विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. २१ साक्षीदारांच्या साक्षीसह साडेचार हजार पानी आरोपपत्र आहे.
मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा २००२च्या कलम ३ परिभाषित आणि कलम ४ शिक्षेस पात्र अन्वये नोंदवलेल्या मनी लाँडरिंगच्या दखलपात्र गुन्ह्यासाठी हे आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले आहे. अटकेच्या तारखेपासून साठ दिवसांच्या वैधानिक कालावधीत ते दाखल केलेले आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (जमीन बळकावणे) दाखल केलेल्या चार आरोपपत्रांच्या आधारे ईडीने पीएमएलए अंतर्गत तपास सुरू केला होता. ही आरोपपत्रे २०२२० व २०२२ मध्ये म्हापसा पोलीस स्थानकात आणि २०२१ मध्ये वाळपई पोलीस स्थानकात नोंदवलेल्या गुन्ह्यांवर आधारित होती.
ईडीच्या आरोपपत्रानुसार, जमीन बळकावण्याच्या प्रकरणांमध्ये गुंतलेला संशयित सिद्दिकी ऊर्फ सुलेमान खान याने उत्तर गोव्यातील मौल्यवान स्थावर मालमत्ता त्यांच्या मूळ मालकांकडून बळकावण्यासाठी एक गुन्हेगारी कट रचला होता. त्याच्या कार्यपद्धतीमध्ये बनावट खरेदीपत्र तयार करणे आणि बनावट मुद्रांक व शिक्क्यांचा वापर करून बार्देश व वाळपई येथील उपनिबंधक कार्यालयांच्या नोंदणी अभिलेखांमध्ये ती घुसडल्याचे दिसून आले होते.
एका प्रकरणात बनावट खरेदीपत्रात जमीन विक्रेता म्हणून अशा व्यक्तीचे नाव होते, जी १९८८ मध्ये मरण पावली होती. तसेच अशा बनावट कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती मिळवणे आणि त्या प्रतींचा वापर करून मूळ मालकांची नावे वगळून जमीन अभिलेखांमध्ये फेरफार करणे, यांचा समावेश होता.
स्थावर मालमत्तेचे २७८ कोटी रुपये मूल्य
संशयिताने बळकावलेल्या मालमत्तेवरील आपल्या बनावट दाव्याद्वारे आर्थिक लाभ मिळवला आणि त्यातून प्राप्त झालेली रक्कम त्रयस्थ पक्ष व बेनामी खातेदारांच्या बँक खात्यांद्वारे तसेच दुसर्या पॅन कार्डचा वापर करून चालवल्या जाणार्या भागीदारी संस्थेद्वारे ’मनी लाँडरिंग’द्वारे फिरवली, असे तपासातून आढळून आले होते. गुन्ह्यातून मिळालेली ही रक्कम कायदेशीर असल्याचे भासवण्यासाठी तिचे मोठ्या प्रमाणावर रोख रकमेत रूपांतर करण्यात आले.
अशा प्रकारे बळकावलेल्या आणि गुन्ह्यातून मिळवलेली मालमत्ता (प्रोसीड्स ऑफ क्राईम) म्हणून ओळखल्या जाणार्या स्थावर मालमत्तेवर जिचे मूल्य २७८ कोटी १६ लाख ४६ हजार ८३७ रुपयांहून अधिक आहे. ईडीने पीएमएलए अंतर्गत ९ सप्टेंबर २०२६ रोजी ही स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केली आहे.


