कोलवाळ तुरुंगातील सांडपाणी दर आठवड्याला साफ करावे : मानवाधिकार आयोग

याप्रकरणी ३० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
कोलवाळ तुरुंगातील सांडपाणी दर आठवड्याला साफ करावे : मानवाधिकार आयोग

पणजी : कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहातील सांडपाण्याची समस्या व यामुळे आरोग्यास निर्माण झालेल्या धोक्याची मानवाधिकार आयोगाने दखल घेतली होती. याबाबत नुकत्याच झालेल्या सुनावणीत आयोगाने सांडपाणी आणि पायभूत विकास महामंडळाला दर आठवड्याला येथे ‘ओव्हर फ्लो’ होणारे सांडपाणी साफ करण्याचे निर्देश दिले आहेत. या कामाचे टेंडर निघेपर्यंत महामंडळाला हे काम करावे लागणार आहे. या प्रकरणी ३० ऑक्टोबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

याबाबत कारागृहाच्या 'बोर्ड ऑफ व्हिजिटर्स'चे नामनिर्देशित सदस्य ॲड. सावियो त्राव्हासो यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी पाठवलेल्या ईमेल तक्रारीची दखल घेत आयोगाने ही कारवाई सुरू केली होती. तक्रारीनुसार, २०२१ पासून कारागृह परिसरात दुर्गंधी आणि सांडपाण्याची गंभीर समस्या भेडसावत आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. यामुळे अस्वच्छता पसरून संसर्गजन्य आजार वाढण्याचा आणि कैदी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाल्याचे तक्रारीमध्ये म्हटले होते.

यानंतर आयोगाने राज्याचे मुख्य सचिव, तुरुंग महानिरीक्षक आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता यांना नोटीस बजावली होती. याबाबत आयोगाने २७ ऑगस्ट २०२६ रोजी यामध्ये पीडब्ल्यूडी खात्याने केलेला उशीर आणि निष्काळजीपणा दिसून येत असल्याचे निरीक्षण नोंदवले होते. या समस्येमुळे कारागृहातील कैदी आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. यामुळे संबंधित तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले होते.

हेही वाचा
सर्व पहा