पणजी: राज्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) गोवा विभागासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा विभाग गोवा मनोरंजन संस्थेतर्फे (ईएसजी) आयोजित करण्यात येणार आहे.
या विभागात निवडक गोमंतकीय फिचर आणि नॉन फिचर चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेशिका पाठवण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर पर्यंत आहे. अर्जाची प्रक्रिया संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जारी करण्यात आली आहे.
यातील गोवन डायरेक्टरस कट या उपविभागात गोमंतकीय दिग्दर्शकांना आपले चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय गोमंतकीय निर्मात्यांसाठी देखील वेगळा उपविभाग असणार आहे.
या दोन्ही विभागांसाठी वेगवेगळे अर्ज भरावे लागतील
निर्माता उपविभागात फिचर अथवा नॉन फिचर चित्रपट पाठवता येणार आहे. यासाठी निर्माता गोमंतकीय असणे आवश्यक आहे. फिचर विभागातील चित्रपट मराठी अथवा कोकणी असावा. तर नॉन फिचर विभागातील चित्रपट मराठी कोकणीसह हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील असणे आवश्यक आहे.
चित्रपटांना सेन्सर बोर्डाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. असे प्रमाणपत्र नसलेला चित्रपट १ ऑक्टोबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२६ दरम्यानचा असावा. फिचर चित्रपट ७० मिनिटे तर नॉन फिचर चित्रपट १० ते ७० मिनिटांपर्यंत असणे आवश्यक आहे.
फिचर चित्रपटासाठी ५ हजार तर नॉन फिचर साठी २ हजार रुपये शुल्क असणार आहे. आलेल्या प्रवेशिकांमधून तीन सदस्यीय ज्युरी अंतिम चित्रपटांची निवड करणार आहेंत. ज्युरींचा निर्णय अंतिम राहील. याबाबत कोणताही दावा करता येणार नसल्याचे ई एस जी ने स्पष्ट केले आहे..


