नवी दिल्ली : येथील ‘भारत मंडपम’ येथे आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या ब्रिक्स परिषदेसाठी जगभरातील प्रमुख नेते भारतात दाखल होत असल्याने राजधानी दिल्लीमध्ये ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. शनिवारी दुपारी २ वाजता ही परिषद सुरू होणार आहे. परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. काही महत्त्वाच्या मार्गांवर तात्पुरते वाहतूक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी, इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद अली सहभागी होत आहेत.
शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय ब्रिक्स परिषदेसाठी दिल्ली पोलिसांचे सुमारे १५ हजार कर्मचारी, निमलष्करी दलांच्या २०० तुकड्या आणि दिल्लीभरात ५०० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तैनात करण्यात आले आहेत. व्हीव्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध महत्त्वाच्या मार्गांवर विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, दिल्ली वाहतूक पोलिसांनी शहर पूर्णपणे बंद राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, व्हीव्हीआयपी कॉन्व्हॉयच्या हालचालीदरम्यान काही मार्गांवर वाहनांना तात्पुरते थांबवले जाऊ शकते किंवा वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाऊ शकते. सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेऊन ज्या ठिकाणी शक्य असेल, तिथे वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येणार आहे.
परदेशी पाहुण्यांच्या हालचालीदरम्यान वाहनांना थांबवण्याचा कालावधी निश्चित नसणार आहे. सुरक्षा परिस्थिती आणि प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतल्यानंतर वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जागतिक नेत्यांना सर्वोच्च सुरक्षा पुरवतानाच सामान्य नागरिकांना कमीत कमी त्रास होईल, यासाठी विशेष वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. ब्रिक्स परिषदेदरम्यान दिल्लीतील महत्त्वाच्या भागांमध्ये सुरक्षा यंत्रणांकडून बारकाईने नजर ठेवली जात आहे.


