जेर्सन गोम्स मारहाण प्रकरण: संशयित माल्कम परेराचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
जेर्सन गोम्स मारहाण प्रकरण: संशयित माल्कम परेराचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालयाने फेटाळला

मडगाव: बहुचर्चित जेर्सन गोम्स मारहाण प्रकरणातील संशयित आरोपी माल्कम परेरा याला दक्षिण गोवा सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. न्यायालयाने परेरा याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या न्यायालयीन निर्णयाचे स्वागत करत, वेळ न घालवता पोलिसांनी संशयित आरोपीला तातडीने अटक करावी, अशी आक्रमक मागणी वेलीचे आमदार क्रूझ सिल्वा यांनी केली आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार क्रूझ सिल्वा म्हणाले की, पीडित जेर्सन गोम्स याला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या ९४ वर्षांच्या वृद्ध आईला कुंकळ्ळी पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली होती. भारतीय कायदेव्यवस्था आणि न्यायप्रणालीवर पूर्ण विश्वास ठेवून त्या वृद्ध मातेने पोलिसांत धाव घेतली होती. आपल्या मुलाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचत नाही हे पाहून त्यांनी न्यायासाठी दार ठोठावले होते.

आता न्यायालयाने जामीन फेटाळल्यामुळे त्या मातेच्या विश्वासाची आणि अश्रूंची परतफेड करण्याची संपूर्ण नैतिक व कायदेशीर जबाबदारी पोलिसांवर आहे. त्यामुळे कुंकळ्ळी पोलिसांनी कोणत्याही विलंबाशिवाय परेराला तात्काळ अटक केली पाहिजे, असे सिल्वा यांनी स्पष्ट केले.

राजकीय हस्तक्षेपाविना निष्पक्ष तपासाचे आवाहन

या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप, दबाव किंवा राजकीय संरक्षण खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत आमदारांनी पोलिसांनी पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक तपास करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. हा विषय कोणत्याही राजकीय विजयाचा किंवा वैयक्तिक सूडबुद्धीचा नसून, केवळ कायद्याचे राज्य प्रस्थापित करण्याचा आणि एका वृद्ध आईच्या विश्वासाचा आहे, असे त्यांनी नमूद केले.

तसेच चिंचणी-देवसू आणि परिसरातील नागरिकांनी पूर्ण शांतता राखावी आणि कायदेशीर प्रक्रियेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले. पीडित जेर्सन गोम्स, त्यांचे कुटुंब आणि त्या वृद्ध मातेला पूर्ण न्याय मिळेपर्यंत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, अशी ग्वाहीही आमदार क्रूझ सिल्वा यांनी दिली.

हेही वाचा
सर्व पहा