पणजी : तालुक्यातील वेळसाव-पाळे-इसोर्शी पंचायत आणि चिखली-बोगमाळो पंचायत यांच्यातील कार्यक्षेत्र बदलाच्या प्रस्तावित निर्णयाला आता नवे वळण मिळाले आहे. इसोर्शी आणि रांघावी इस्टेटचा समावेश असलेला वॉर्ड क्रमांक ७ वेळसाव पंचायतीतून वगळून तो चिखली-बोगमाळो पंचायतीत विलीन करण्याच्या हालचालींना वेळसाव पंचायतीने यापूर्वी तीव्र विरोध दर्शवला होता. या श्रीमंत निवासी भागातून मिळणारा महसूल हे या विरोधामागचे मुख्य कारण मानले जात होते. मात्र, आता स्थानिक ग्रामस्थांच्या भूमिकेमुळे या वादाचे चित्र बदलले आहे.
या प्रस्तावित बदलासंदर्भात चर्चा करण्यासाठी येत्या रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंच व समाजसेवक रोकेझिन्हो डिसोझा यांनी सुरुवातीला या निर्णयाविरोधात हरकत पत्र तयार केले होते. मात्र, प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी त्यांनी इसोर्शी भागाला भेट दिली असता, स्थानिक ग्रामस्थांनी स्वतःच वेळसाव पंचायतीतून बाहेर पडण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भागात कोणताही विकास झालेला नाही आणि प्रशासनाकडून सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
ग्रामस्थांची ही भूमिका ऐकल्यानंतर डिसोझा यांनी आपली जुनी भूमिका बदलून इसोर्शी वासियांच्या मागण्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी वेळसाव पंचायतीच्या सरपंचांसह या वॉर्डाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंचांवर जोरदार निशाणा साधला. जर ग्रामस्थ स्वतःच दुर्लक्षित असल्याची भावना व्यक्त करत असतील, तर त्यांच्या लोकशाही अधिकाराचा आणि आवाजाचा आदर झालाच पाहिजे, असे डिसोझा यांनी स्पष्ट केले.


