पर्वरी गोळीबार प्रकरण: संशयित काझू शेख अन् सूरज आचार्यला ४ दिवसांची कोठडी

कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना मुंबई व उत्तर प्रदेशातून अटक केली असून, म्हापसा न्यायालयाने दोघा संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
पर्वरी गोळीबार प्रकरण: संशयित काझू शेख अन् सूरज आचार्यला ४ दिवसांची कोठडी

म्हापसा: पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणी गुन्हे शाखेने (Crime Branch) अटक केलेले तिन्ही संशयित हे मुख्य हल्लेखोरांचे सहआरोपी असल्याचे उघडकीस आले आहे. संशयित काझू शेख याने हल्लेखोरांचा चालक म्हणून भूमिका बजावली होती, तर सूरज आचार्य याने गुन्ह्यात वापरलेल्या वाहनाची व्यवस्था केली होती. इसरार अली अहमद हा या दोघांचा प्रमुख साथीदार असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

मुंबई अन् उत्तर प्रदेशातून संशयितांना बेड्या

गुन्हे शाखेने या आंतरराज्यीय गुन्ह्याचा छडा लावत काझू अलाउद्दीन शेख (वय २८, रा. शिवाजीनगर, मुंबई) याला उत्तर प्रदेशातील जौनपूर पोलिसांच्या मदतीने अटक केली. तर इसरार अली अहमद (वय २५, रा. उत्तर प्रदेश) आणि सूरज उपेंद्र आचार्य (वय ३६, रा. बोरिवली पूर्व, मुंबई) या दोघांना मुंबईतून ताब्यात घेण्यात आले. यापैकी संशयित काझू शेख आणि सूरज आचार्य या दोघांना गुरूवारी म्हापसा प्रथम वर्ग न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रेकी, कारची व्यवस्था आणि सुखरूप पलायन

पोलीस तपासातून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सूरज आचार्य हा परराज्यातील पर्यटकांना गोव्यातील व्हिला, फ्लॅट्स आणि गाड्या भाड्याने देणारा दलाल (ब्रोकर) म्हणून काम करतो. तो कांदोळी आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून वास्तव्यास असायचा. श्रीनिवास नायक यांच्यावर हल्ला करण्यासाठी वापरण्यात आलेली कार सूरजनेच मिळवून दिली होती.

दुसरीकडे, संशयित काझू शेख याने गुन्ह्यात वापरलेल्या कारचा चालक म्हणून काम केले. हल्ल्यापूर्वी परिसराची रेकी करणे आणि गोळीबार झाल्यानंतर मुख्य आरोपींना गोव्याबाहेर सुखरूप पोहोचवण्याची जबाबदारी काझूवर होती. गुन्ह्याच्या कटात या दोघांशी इसरार अली अहमद याचे घनिष्ठ संबंध असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याच्याही मुसक्या आवळल्या आहेत.

घटनेची पार्श्वभूमी

निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४७ वाजण्याच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झाला होता. नायक हे हॉटेलमधून आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी निघत असताना, दबा धरून बसलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर अचानक गोळीबार केला. या जीवघेण्या हल्ल्यातून नायक सुदैवाने कोणतीही दुखापत न होता बालंबाल बचावले.

हल्ल्यानंतर दोन्ही मुख्य संशयित पसार झाले होते. सुरुवातीला पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), १२५, ३(५) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या (Arms Act) कलम ३ व २७ अन्वये गुन्हा नोंदवला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य शासनाने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता.

हेही वाचा
सर्व पहा