गोव्यातून धारवाडला बेकायदेशीर मद्यवाहतूक; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ढाबा मालक गजाआड

गोव्यातून धारवाडला बेकायदेशीरपणे मद्याची तस्करी करणाऱ्या ढाबा व्यावसायिकाला अबकारी विभागाने पहाटे छापा टाकून अटक केली. या कारवाईत १५२ लिटर मद्यासह १७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
27 mins ago
गोव्यातून धारवाडला बेकायदेशीर मद्यवाहतूक; १७ लाखांचा मुद्देमाल जप्त, ढाबा मालक गजाआड

जोयडा: गोव्यातून कर्नाटकातील धारवाड येथे बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या एका ढाबा व्यावसायिकावर अबकारी (राज्य उत्पादन शुल्क) विभागाने पहाटेच्या सुमारास धडक कारवाई केली. या धडक कारवाईत आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून, त्याच्याकडून १५२.३८० लिटर गोवा मद्य, तस्करीसाठी वापरलेली लक्झरी कार, दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १७ लाख ६१५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास अबकारी विभागाची धाड

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, धारवाड येथील जयजिनेंद्र कॉलनीचा रहिवासी आणि ढाबा व्यावसायिक रेवणसा परशुराम कठारे हा गोव्यातून महागड्या ब्रँड्सच्या मद्याची कोणत्याही कायदेशीर परवान्याशिवाय (Pass/Permit) बेकायदेशीर वाहतूक करत होता. या माहितीच्या आधारे अबकारी विभागाच्या पथकाने सापळा रचून पहाटे सुमारे २.२० वाजता धडक कारवाई केली.

१७ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

कारवाईदरम्यान आरोपीच्या ताब्यातून विविध नामांकित ब्रँड्सचे १५२.३८० लिटर गोवा बनावटीचे मद्य जप्त करण्यात आले. तसेच तस्करीसाठी वापरण्यात आलेली काळ्या रंगाची हुंडाई एलांट्रा कार (Hyundai Elantra), सुजुकी ॲक्सेस (Suzuki Access) दुचाकी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मुद्देमालाची बाजारभावानुसार किंमत १७ लाख ६१५ रुपये इतकी आहे. आरोपीविरुद्ध अबकारी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

सदर यशस्वी कारवाई धारवाड जिल्ह्याचे अबकारी उपआयुक्त आणि हुबळी विभागाचे अबकारी उपअधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पार पडली. अबकारी अधिकारी विश्वनाथ एस. माविनकट्टी, अबकारी उपनिरीक्षक नागनगौडा पाटील, मच्छेंद्र रोडकर, अशोक सफारे आणि शिवानंद सुणगार यांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली.


हेही वाचा
सर्व पहा