गोव्यातून परराज्यांत बेकायदेशीर मद्यतस्करीत प्रचंड वाढ; १५ दिवसांत ५१ लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त!

१५ दिवसांच्या कालावधीत (२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर) गोवा आणि कर्नाटक अबकारी खात्याने विविध सीमांवर टाकलेल्या धाडींमध्ये ५५२.३८० लिटर गोवा मेड दारूचे तब्बल ७०० खोके जप्त करण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेल्या गाड्या, मद्यसाठा आणि इतर वस्तूंची एकूण किंमत ५१ लाख ६२ हजार ६१५ रुपयांपेक्षा अधिक आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गोव्यातून परराज्यांत बेकायदेशीर मद्यतस्करीत प्रचंड वाढ; १५ दिवसांत ५१ लाखांपेक्षा जास्त किमतीचा माल जप्त!

पणजी : गोव्यातून शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात बेकायदेशीरपणे दारूची तस्करी करण्याचे प्रमाण कमालीचे वाढल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गेल्या १५ दिवसांत (२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर) अबकारी (उत्पादन शुल्क) विभागाने गोवा-महाराष्ट्र आणि गोवा-कर्नाटक सीमांवर विविध ठिकाणी धाडी टाकून बेकायदेशीर मद्यतस्करीचे मोठे कट उधळून लावले आहेत. कांदे-बटाट्यांची पोती, गाडीतील सीक्रेट कंपार्टमेंट आणि लक्झरी गाड्यांचा वापर करून होणाऱ्या या आंतरराज्यीय तस्करीवर अबकारी अधिकाऱ्यांनी कडक नजर ठेवून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

११ सप्टेंबर (सकाळी): कणकुंबी चेकपोस्टवर ४०० लिटर 'गोवा मेड' मद्य जप्त

गोवा-कर्नाटक आंतरराज्यीय मार्गावरील कणकुंबी तपासणी नाक्यावर अबकारी विभागाने ११ सप्टेंबर रोजी सकाळी धडक कारवाई करत गोव्यातून कर्नाटकात नेला जाणारा सुमारे ४०० लिटर 'गोवा मेड' मद्यसाठा जप्त केला. कॅन आणि बाटल्यांमध्ये भरलेला हा साठा 'भारत बेंझ' या सहाचाकी वाहनाच्या मागील भागात तयार केलेल्या विशेष गुप्त कप्प्यात लपवण्यात आला होता.

तपासणीदरम्यान या वाहनाची सखोल झडती घेतली असता मागील भागात केलेले पार्टिशन आढळून आले. यात लपवलेले ४०० लिटर स्पिरिट व मद्य जप्त करून वाहनासह १० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी सिद्धाप्पा मारुती बेळ्ळीकुंपे (रा. माडमगेरी, जि. बेळगाव) आणि मंजुनाथ हनमंतप्पा देसाई (रा. कडबी, जि. बेळगाव) या दोघांना कर्नाटक अबकारी कायदा १९६५ अंतर्गत अटक करण्यात आली. ही कारवाई अबकारी निरीक्षक मल्लेशी उप्पार, बाळगौड पाटील, उपनिरीक्षक नुरुल्ला खान व पथकाने केली.

११ सप्टेंबर (पहाटे): धारवाड येथे १५२ लिटर मद्यासह लक्झरी कार जप्त

धारवाड येथे गोव्यातून बेकायदेशीरपणे महागड्या ब्रँडच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका ढाबा व्यावसायिकावर अबकारी विभागाने पहाटे २.२० वाजता छापा टाकला. धारवाडच्या जयजिनेंद्र कॉलनीतील रहिवासी व ढाबा मालक रेवणसा परशुराम कठारे याला रंगेहात पकडण्यात आले.

आरोपीकडून १५२.३८० लिटर गोवा बनावटीचे मद्य, वाहतुकीसाठी वापरलेली हुंडाई एलांट्रा कार, सुजुकी ॲक्सेस दुचाकी आणि मोबाईल असा एकूण १७ लाख ६१५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हुबळी-धारवाडच्या अबकारी उपआयुक्त व उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी विश्वनाथ माविनकट्टी, नागनगौडा पाटील, मच्छेंद्र रोडकर, अशोक सफारे व शिवानंद सुणगार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

७ सप्टेंबर: पोळे सीमेवर बटाट्यांच्या गोण्यांआड लपवलेले व्हिस्कीचे ३०० खोके जप्त

७ सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पोळे-काणकोण सीमेवर बटाट्यांच्या गोण्यांच्या आड लपवून कर्नाटकात नेली जाणारी अवैध दारूची तस्करी उधळण्यात आली. एका संशयित ट्रकला अडवून विचारणा केली असता चालकाने बटाटे असल्याचे सांगितले. मात्र, सामान्यतः बटाट्यांची आवक कर्नाटकातून गोव्यात होते, गोव्यातून कर्नाटकात नाही; या विसंगतीमुळे अधिकाऱ्यांचा संशय बळावला.

तपासणी सुरू होताच चालक आणि क्लिनर अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. ट्रकमधील बटाट्यांच्या गोण्यांमागे लपवलेले व्हिस्कीचे तब्बल ३०० खोके (किंमत १८ लाख ७२ हजार रुपये) आणि साडेपाच लाखांचा ट्रक असा २४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अबकारी अधिकारी रोहित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रदीप खोलकर व पथकाने ही कारवाई केली.

२८ ऑगस्ट: पत्रादेवी नाक्यावर कांद्यांच्या गोण्यांआड लपवलेले दारूचे ४०० खोके जप्त

२८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजता गोव्यातून महाराष्ट्रात होणारी बेकायदेशीर दारू वाहतूक पेडणे येथील पत्रादेवी चेकनाक्यावर उघडकीस आली. कांदे-बटाट्यांची पोती वाहून नेणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता, पुढील भागात कांद्याच्या पिशव्या आणि मागील भागात 'मॅकडॉवेल' ब्रँडच्या १८० एमएल बाटल्यांचे तब्बल ४०० खोके लपवून ठेवल्याचे समोर आले.

कारवाईदरम्यान ट्रकचालकाने पळ काढला. अबकारी निरीक्षक सलील वळवईकर, विक्रांत कोरगावकर, निलेश गावडे, उदय गवस व सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. या प्रकरणात जप्त मद्य आणि एकंदरीत मुद्देमालाची कींत अद्याप निर्धारित झालेली नाही. 

एक्टिव्ह झालेले परराज्यातील मद्यतस्करीचे रॅकेट आणि पोलिसांसमोरील आव्हाने

२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या अवघ्या १५ दिवसांच्या कालावधीत घडलेल्या या चार मोठ्या कारवायांवरून गोव्यातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात चालणाऱ्या बेकायदेशीर मद्यतस्करीचे नेटवर्क किती व्यापक आहे हे स्पष्ट होते. परराज्यांच्या तुलनेत गोव्यात मद्यावरील कर कमी असल्याने मोठा नफा कमावण्याच्या उद्देशाने तस्कर वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून मद्यतस्करी करत आहेत. सीमा नाक्यांवरील अबकारी खात्याच्या सतर्कतेमुळे हे कट उधळले गेले असले, तरी या तस्करांमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. 


हेही वाचा
सर्व पहा