म्हापसा : अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने बार्देश तालुक्यात विविध खाद्यपदार्थ उत्पादन आणि विक्री केंद्रांवर छापा टाकून झडती घेतली. या मोहिमेत मिठाई आणि फरसाण निर्मिती करणार्या सहा आस्थापनांमधील ३२० किलो फरसाण आणि १७५ किलो मावा असा १ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल अधिकारी रिचर्ड नोरोन्हा, अन्न सुरक्षा अधिकारी अमित मांद्रेकर, डार्लेन दिवकर, कर्मचारी साईनाथ च्यारी व संदीप शेळके यांच्या पथकाने हा छापा टाकला.
तपासणीवेळी दोन खाद्य व्यवसायाची आस्थापने अत्यंत अस्वच्छ वातावरणात सुरू असल्याचे उघडकीस आले. मावा योग्य शीतकरणाशिवाय (रेफ्रिजरेशन) साठवून ठेवण्यात आला होता. तर इतर खाद्यपदार्थ अत्यंत अस्वच्छ स्थितीत तयार केले जात होते व साठवले जात होते.
अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकार्यांनी त्वरित कारवाई करत सुमारे ६४ हजार रुपये किमतीचा ३२० किलो फरसाण आणि ३७ हजार रुपये किमतीचा १८५ किलो मावा, असा एकूण १ लाख रुपयांहून जास्त किमतीचा साठा जप्त केला व तो जागीच नष्ट केला. शिवाय त्रुटींची पूर्तता करून स्वच्छतेचे निकष पूर्ण करेपर्यंत संबंधित आस्थापनांना कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
राज्यातील विविध भागात अशी तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे. सर्व खाद्य व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांनी केले आहे.


