दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६ चा अत्यंत रोमांचक आणि अंतिम महामुकाबला भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळवला जाणार आहे. हा दिमाखदार सामना रविवारी, १३ सप्टेंबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय समयानुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. विक्रमी ७ वेळा आशिया कप उंचावणारी भारतीय महिला संघ आपला हा आठवा किताब पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे, तर गतविजेत्या श्रीलंकेविरुद्ध मागील पराभवाचा वचपा काढण्याची सुवर्णसंधी टीम इंडियासमोर असणार आहे.
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघाने आशिया कपच्या या हंगामात संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता अपराजित राहत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमधील हा अंतिम सामना अत्यंत चुरशीचा आणि रोमहर्षक होईल यात शंका नाही. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गतवर्षीच्या अंतिम सामन्यातील पराभवाचे मळभ दूर करण्यासाठी मैदानात उतरेल. २०२४ मध्ये दाम्बुला येथे झालेल्या फायनलमध्ये श्रीलंकेने भारताचा ८ विकेट्स राखून पराभव केला होता. त्या सामन्यातील चामारी अटापट्टू आणि हर्षिता समरविक्रमा यांसारख्या अनुभवी खेळाडू पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संघात असल्यामुळे भारताला सावधगिरी बाळगावी लागेल.
भारतीय संघाच्या फलंदाजीचा विचार करता, युवा सलामीवीर शेफाली वर्मा हिने या संपूर्ण स्पर्धेत आपली उत्कृष्ट लय कायम राखली आहे. दोन अर्धशतकांसह १६८ धावा करणारी शेफाली भारताची सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरली आहे. दुबईच्या संथ आणि फिरकीपटूंना अनुकूल अशा खेळपट्टीवरही तिने अत्यंत सहजतेने धावा केल्या आहेत. तिच्यासोबत उपकर्णधार स्मृती मंधाना हिने एका शानदार शतकाच्या बळावर १५४ धावा केल्या आहेत, जरी तिला काही सामन्यांत अपयशाचा सामना करावा लागला तरी तिची उपस्थिती संघासाठी महत्त्वाची ठरते.
मात्र, भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे मधल्या फळीतील फलंदाजीची अस्थाव्यस्थता आणि खालावलेली क्षेत्ररक्षण पातळी. शेफाली आणि स्मृतीचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांना चांगल्या सुरुवातीचे मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतर करता आलेले नाही. विशेषतः क्षेत्ररक्षणात भारताने संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत तब्बल ९ झेल सोडले आहेत. उपांत्य सामन्यात आणि त्यापूर्वीच्या लढतींत झेल सुटल्यामुळे गोलंदाजांवर अतिरिक्त ताण आला आहे, ज्यावर कर्णधार हरमनप्रीत कौरला गांभीर्याने काम करावे लागेल.
भारताच्या विजयात अष्टपैलू खेळाडूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. श्रीलंकेची कर्णधार चामारी अटापट्टू हिच्यासोबतच भारताची स्टार अष्टपैलू खेळाडू दीप्ति शर्मा हिने सर्वाधिक ११ विकेट्स पटकावून आपली बाजी मारली आहे. गोलंदाजीसोबतच तिने फलंदाजीतही उपयुक्त योगदान दिले आहे. बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य फेरीत तिने अवघ्या ६ चेंडूंत १३ धावांची आक्रमक खेळी करत संघाला १५0 धावांच्या टप्प्यापर्यंत पोहोचवले होते. दीप्तिला श्री चरणी आणि प्रेमा रावत या फिरकीपटूंनी उत्तम साथ दिली आहे. या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी दुबईच्या फिरकीला अनुकूल पिचेसवर आपल्या अचूक माऱ्याने विरोधी फलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे.
बॉक्स
श्रीलंकेचे मजबूत आव्हान
दुसरीकडे, चामारी अटापट्टूच्या नेतृत्वाखालील श्रीलंका संघानेही अत्यंत जुझारू वृत्तीचे प्रदर्शन केले आहे. उपांत्य सामन्यात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत सुरुवातीलाच ५ धावांवर २ आणि ३३ धावांवर ४ गडी बाद झाल्यानंतरही श्रीलंकेने हार मानली नाही. हर्षिता समरविक्रमा (३६ धावा) आणि कविशा दिलहारी (३३ धावा) यांनी संघाला संकटातून बाहेर काढून १३१ धावांचे लक्ष्य लीलया पार केले. तसेच नीलाक्षिका सिल्वा आणि कौशिनी नुतियांगना यांनी फिनिशरची भूमिका अतिशय चोख बजावली आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेच्या मधल्या आणि तळाच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच अंकुश ठेवावा लागेल.
बॉक्स
मैदानाची परिस्थिती
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी सुरुवातीला कठीण ठरत असून जसजसा सामना पुढे सरकतो, तसतशी ती फिरकी गोलंदाजांसाठी स्वर्ग ठरते. अशा स्थितीत नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करून धावसंख्या उभी करण्याचा प्रयत्न करू शकतो. भारताकडे अनुभवी खेळाडूंचा भरणा असला तरी क्षेत्ररक्षणातील चुका सुधारणे आणि मधल्या फळीत अधिक जबाबदारीने खेळणे विजयाची गुरुकिल्ली ठरेल.
संभाव्य संघ
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृति मंधाना (उप-कर्णधार), भारती फुलमाली, ऋचा घोष (यष्टीरक्षक), गुनालन कमलिनी (यष्टीरक्षक), प्रतिका रावल, शेफाली वर्मा, दीप्ति शर्मा, क्रांति गौड़, प्रेमा रावत, अरुंधति रेड्डी, रेणुका सिंह ठाकुर, नंदनी शर्मा, श्री चरणी, राधा यादव.
श्रीलंका: चामारी अटापट्टू (कर्णधार), हर्षिता समरविक्रमा (उपकप्तान), इमेशा दुलानी, विष्मी गुणरत्ने, कौशिनी एन (यष्टीरक्षक), संजना कविंदी, हसिनी परेरा, निलाक्षिका सिल्वा, कविशा दिलहारी, मिताली अयोध्या, काव्या काविंदी, सुगंधिका कुमारी, निमाशा मीपागे, चामुदी प्रबोधा, चेतना विमुक्ति.


