पणजी : गोवा पोलीस क्राईम ब्रँच आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या संयुक्त कारवाईने पर्वरी येथील निओ मॅजेस्टिक कॅसिनो संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील मुख्य शूटरच्या मुसक्या आवळल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असताना संशयित शूटर बाबू उर्फ इसार अली (वय ३५, रा. बुड्डापुरवा, रिशिया, बहराइच) याला उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स (UP STF) आणि गोवा क्राईम ब्रँचच्या संयुक्त पथकाने अटक केली. या प्रकरणी क्राईम ब्रँचकडून आतापर्यंत चार जणांना अटक झाली आहे.
काय आहे प्रकरण ?
२८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८:४७ वाजता पर्वरी येथील हॉटेल निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक आपल्या निवासस्थानी जाण्यासाठी बाहेर पडत असताना, दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला. नायक यांच्या सुरक्षा रक्षकांनी प्रतिकरात्मक तीन राऊंड फायर केल्यानंतर ते घटनास्थळावरून फरार झाले होते. सुदैवाने श्रीनिवास नायक या हल्ल्यातून बालंबाल बचावले.
घटनेनंतर पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९(१), १२५, ३(५) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ व २७ अन्वये गुन्हा नोंदवला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तपास क्राईम ब्रँचकडे वर्ग केला. तपासादरम्यान क्राईम ब्रँचने शूटर बाबूची ओळख पटवून उत्तर प्रदेश एसटीएफची मदत मागितली. बहराइचमधील रिशिया मोड पार्कजवळ संशयित नेपाळच्या सीमेवर पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच, एसटीएफचे पोलीस उपअधीक्षक (DySP) प्रमेश शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५:३९ वाजता आवश्यक बलाचा वापर करून त्याला बेड्या ठोकल्या.
अण्णाचे कनेक्शन, ५ लाखांची सुपारी आणि बाबूचा भूतकाळ
पोलीस चौकशीदरम्यान आरोपी बाबूने आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आणि या हल्ल्याचा संपूर्ण उलगडा केला. २०१४ मध्ये भावाला एका गुन्ह्याप्रकरणी भेटण्यासाठी तो तळोजा मध्यवर्ती कारागृहात (नवी मुंबई) जात असताना, त्याची ओळख 'अण्णा' नावाच्या कैद्याशी झाली. २०२४ मध्ये कारागृहातून सुटल्यानंतर अण्णाने गोव्यात ज्यूस आणि वडापावची गाडी सुरू केली होती.
जानेवारी २०२६ मध्ये बाबू आपल्या भावाच्या सांगण्यावरून गोव्यात अण्णाकडे कामाला आला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अण्णाने तीन पिस्तूलची व्यवस्था केली होती. त्याने एका "मोठ्या व्यक्तीला" संपवायचे असल्याचे सांगून ५ लाख रुपयांची सुपारी बाबूला दिली आणि हातात पिस्तूल सोपवले. पैशांच्या लालसेने बाबूने अण्णासोबत निओ मॅजेस्टिक हॉटेलमध्ये श्रीनिवास नायक यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर पिस्तूल अण्णाकडे देऊन तो मुंबईला भावाकडे गेला आणि तेथून बहराइचला पोहोचला.
गोव्यात ट्रांझिट रिमांडवर आणले; ४ दिवसांची पोलीस कोठडी
उत्तर प्रदेशात अटक केल्यानंतर क्राईम ब्रँचच्या पथकाने बाबूला रविवारी, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ट्रांझिट रिमांडवर गोव्यात आणले. म्हापसा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणात क्राईम ब्रँचने यापूर्वी १० सप्टेंबर रोजी काझू अलाउद्दीन शेख (२८, रा. मुंबई) याला जौनपूर येथून, तर इसरार अली अहमद (२५, रा. उत्तर प्रदेश) आणि सूरज उपेंद्र आचार्य (३६, रा. बोरीवली, मुंबई) यांना मुंबईतून अटक केली होती. आता मुख्य शूटर बाबूच्या अटकेमुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या चार झाली आहे. क्राईम ब्रँच आता मुख्य सूत्रधार 'अण्णा' आणि दुसऱ्या फरार शूटरचा कसून शोध घेत आहे.


