'गोवा फर्स्ट अलायन्स' : केजरीवाल-सरदेसाई यांची आज पत्रकार परिषद

गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड'ने तयारी सुरू केली असून, 'गोवा फर्स्ट अलायन्स'ची घोषणा आज दुपारपर्यंत अधिकृतरीत्या होण्याची शक्यता आहे. अरविंद केजरीवाल काल रविवारी गोव्यात दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी ट्विट करून गोव्यात मोठी घोषणा करण्याचे सुतोवाच केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
15 mins ago
'गोवा फर्स्ट अलायन्स' : केजरीवाल-सरदेसाई यांची आज पत्रकार परिषद

पणजी: गोव्यात २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग आला असून, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्यासाठी 'आम आदमी पार्टी'आणि विजय सरदेसाई यांच्या नेतृत्वाखालील 'गोवा फॉरवर्ड पार्टी' एकत्र आले आहेत. रविवारी दुपारी २:४५ वाजता 'गोवा इंटरनॅशनल सेंटर' येथील 'अबोली हॉल'मध्ये आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष विजय सरदेसाई या नव्या राजकीय युतीची आणि 'गोवा फर्स्ट अलायन्स' या तिसऱ्या आघाडीची अधिकृत घोषणा करणार आहेत. या घडामोडींमुळे राज्यातील विरोधी पक्षांच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत असून, काँग्रेससमोर राजकीय आव्हान निर्माण झाले आहे.

शनिवारी सकाळी गोव्यातील प्रमुख राष्ट्रीय महामार्गांवर 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड Party' चे संयुक्त होर्डिंग्ज लावण्यात आले. "काँग्रेस आणि भाजपने तुम्हाला दोनदा फसवले, आता तिसऱ्यांदा त्यांच्या फसवणुकीला बळी पडू नका" असा संदेश या होर्डिंग्जवर आहे. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी 'एक्स' (ट्विटर) वर पोस्ट करत गोव्यात एका महत्त्वाच्या घोषणेसाठी येत असल्याचे नमूद केले. सध्या गोव्यात 'आप'चे वेन्झी व्हिएगस (बाणावली) आणि क्रूझ सिल्वा (वेळ्ळी) हे दोन आमदार आहेत, तर 'गोवा फॉरवर्ड'चे विजय सरदेसाई (फातोर्डा) हे एकमेव आमदार आहेत. या दोन्ही पक्षांच्या युतीमुळे राज्यात भाजप आणि काँग्रेस व्यतिरिक्त  एक प्रादेशिक व विरोधी पर्याय उभा राहत आहे.

काँग्रेसला बाजूला ठेवण्यामागची पार्श्वभूमी

विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या चर्चा सुरू असतानाच 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड'ने काँग्रेसशिवाय पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे काँग्रेसमधील भूतकाळातील पक्षांतर आणि निर्णय घेण्यातील विलंब ही प्रमुख कारणे असल्याचे दोन्ही पक्षांचे म्हणणे आहे. गेल्या सात वर्षांत काँग्रेसच्या १८ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे; यामध्ये २०१९ मधील १० आमदार आणि सप्टेंबर २०२२ मधील ८ आमदारांचा समावेश आहे. काँग्रेस आमदारांच्या या पक्षांतरामुळे भाजपला राजकीय स्थैर्य मिळाले, असा आरोप 'गोवा फॉरवर्ड'च्या नेत्यांनी केला आहे.

दुसरीकडे, निवडणुका जवळ आल्यावर निर्णय घेण्याच्या काँग्रेसच्या धोरणावर 'आप'ने टीका केली आहे. युतीसाठी दीर्घकालीन पूर्वतयारी आवश्यक असते आणि काँग्रेसकडून ठोस प्रतिसाद न मिळाल्याने इतर पक्षांना थांबून राहणे शक्य नव्हते, अशी भूमिका 'आप'च्या नेत्यांनी मांडली आहे. मात्र, भविष्यात भाजपविरोधी सेक्युलर विचारसरणीच्या पक्षांसाठी आघाडीची दारे खुली राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या दोन महिन्यांतील राजकीय घटनाक्रम

जुलै - ऑगस्ट २०२६: विजय सरदेसाई यांनी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी प्राथमिक चर्चा सुरू केली.

ऑगस्ट अखेर: काँग्रेसकडून स्पष्ट प्रतिसाद न मिळाल्याने सरदेसाई यांनी चर्चा तात्पुरती स्थगित केली.

सप्टेंबरचा पहिला आठवडा: 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड' यांच्यात पडद्यामागून चर्चा सुरू झाली.

१२ सप्टेंबर (सकाळ ): राज्यभरात संयुक्त होर्डिंग्ज लावले गेले आणि केजरीवाल यांची पोस्ट समोर आली.

१२ सप्टेंबर (संध्याकाळ) : 'गोवा फॉरवर्ड'च्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत २०२७ च्या निवडणुकीसाठी भाजपविरोधात सेक्युलर पक्षांसोबत युती करण्याचा ठराव मंजूर झाला. 'गोवा फर्स्ट' हा नारा निश्चित करण्यात आला.

 विजय सरदेसाई यांची भूमिका

विजय सरदेसाई यांनी काँग्रेससोबतच्या युतीबाबत सावध आणि व्यावहारिक भूमिका घेतली आहे. काँग्रेसमधील अनिश्चितता आणि निवडणुकीनंतर आमदारांच्या टिकाऊपणाबाबत असलेल्या शंकांमुळे, ऐनवेळी निर्णय रखडल्यास विरोधी मतांचे विभाजन होऊन भाजपला फायदा होईल, असा अंदाज सरदेसाई यांनी बांधला. त्यामुळे काँग्रेसच्या निर्णयाची वाट न पाहता त्यांनी 'आप'सोबत युतीचा पुढाकार घेतला.

सध्या गोव्यात त्रिकोणी राजकीय संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अद्याप "काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डची युतीची चर्चा हायमांड पातळीवर सुरूच आहे" असा दावा केला असून, हे होर्डिंग्ज गोंधळ घालण्यासाठी भाजपद्वारे लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला आहे.दुसरीकडे, भाजप हा वर्षांच्या अपार मेहनतीतून आणि समर्पणातून तळागाळातून वर आलेला पक्ष आहे; आम्ही अळंबीसारखे एका रात्रीत उगवलेलो नाही. आम्ही गोव्यातील जनतेसाठी सातत्याने काम केले आहे. आम्हाला कोणत्याही राजकीय आघाड्यांची किंवा युतीची चिंता नाही आणि त्याचा भाजपच्या भवितव्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी म्हटले आहे.

 मात्र, 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड'ची ही नवी आघाडी काँग्रेसवर आणि पर्यायाने भाजपवर देखील राजकीय दबाव निर्माण करणारी ठरली आहे. काँग्रेसने वेळेत निर्णय न घेतल्यास, राज्यात 'काँग्रेस विरुद्ध भाजप' ऐवजी 'गोवा फर्स्ट अलायन्स विरुद्ध भाजप' अशी मुख्य लढत उभी राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. . 


हेही वाचा
सर्व पहा