म्हापसा :पर्वरी येथील नवीन उड्डाणपुलावर भरधाव बलेनो कारने दुचाकी आणि ट्रकला दिलेल्या धडकेत दोघांचा बळी गेला आहे. यात दुचाकीस्वार आणि कारमधील महिला प्रवाशाचा समावेश असून, नऊ वर्षांच्या मुलीसह कारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा उड्डाणपूल शुक्रवारीच वाहतुकीसाठी खुला झाला होता आणि २४ तासांच्या आतच त्यावर ही भीषण दुर्घटना घडली.
हा अपघात शनिवारी (दि. १२) सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास निओ मॅजेस्टिक हॉटेलसमोर घडला. म्हापशाहून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव बलेनो कारने (जीए ०३ एएफ ०५७५) सुरुवातीला एका अॅक्टिव्हा दुचाकीला (जीए ०५ एम ३७५२) धडक दिली. त्यानंतर कार आणि दुचाकीने ट्रकला (जीए ०७ टी ०७१२) जोरदार ठोकर मारली. यात बलेनो कार आणि ट्रकच्या मध्ये दुचाकी पूर्णपणे चिरडली गेली.
एकाचा जागीच मृत्यू, महिलेचा उपचारादरम्यान बळी
या भीषण अपघातात दुचाकीस्वार सर्वेश नीळकंठ वेंगुर्लेकर (वय ४१, रा. सांताक्रूझ, तिसवाडी; मूळ रा. सातार्डा, सिंधुदुर्ग) हे चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
तसेच, कारमधील प्रवासी अमिता रुपेश साळगावकर (वय ३८, रा. बामणवाडा, शिवोली), कारचालक रौनक महेंद्र च्यारी (वय २२, रा. च्यारीवाडा, मयडे ) आणि संगीता सूरज पोखरे (वय ९, रा. शिवोली) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) हलवण्यात आले.
अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून बलेनो कारच्या दर्शनी भागाचाही पूर्णपणे चुराडा झाला आहे. अपघातानंतर ट्रकचालक रजीबाब बडिगर (रा. चिंबल, तिसवाडी) याने घटनास्थळावरून पलायन केले. मात्र, नंतर तो थेट पर्वरी पोलिसांना शरण गेला.
या दुर्घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
घटनेची माहिती मिळताच पर्वरीचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक सीताराम मळीक, संकेत तळकर आणि अरुण शिरोडकर यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
निष्काळजीपणे वाहन चालवून निष्पाप दुचाकीस्वार आणि कारमधील प्रवाशाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पोलिसांनी कारचालक रौनक च्यारी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.


