सरकार सुसाट, तर विरोधक संभ्रमात

निवडणूक जवळ पोचल्याने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विरोधक चर्चा तसेच बैठका घेण्यात व्यस्त असताना सरकारने मात्र उद्घाटने तसेच योजनांचा सपाटा चालविला आहे. सरकार सुसाट व विरोधक संभ्रमात अशी सध्याची स्थिती आहे.

Story: कॉलिंग अटेंशन |
12th September, 11:46 pm
सरकार सुसाट, तर विरोधक संभ्रमात

गो​मंतकीयांचा आवडता उत्सव असलेल्या चतुर्थीला उद्यापासून सुरवात होत आहे. चतुर्थीमुळे येते काही दिवस राज्यातील वातावरण मंगलमय राहणार आहे. आरत्या, भजने तसेच गणपती बाप्पाच्या उदघोषामुळे राजकारण काहीसे बाजूला पडणार आहे. मंत्री, आमदार तसेच राजकीय पक्षांचे नेते कार्यकर्ते तसेच लोकांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेणार आहेत. चतुर्थी हा वर्षागणीक साजरा होणार उत्सव असला तरी यंदाची चतुर्थी वेगळीच असणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने यंदा गणेशोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक जनसंपर्क साधण्याचा प्रयत्न इच्छुक उमेदवारांकडून होणार आहे. 

चुतर्थी संपताच सभा, बैठका तसेच राजकीय हालचालींना पुन्हा वेग येणार आहे. विधानसभा निवडणूक बहुतांशी फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मार्चमध्ये विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्याने त्यापूर्वी निवडणूक होणे आवश्यक आहे. ही निवडणूक काँग्रेस व इतर पक्ष अशी दुरंगी होणार की बहुरंगी होणार, हाच खरा प्रश्न आहे. विरोधकांच्या तुलनेत सत्ताधारी भाजप तयारीच्या दृश्टीने बराच पुढे आहे. संघटनात्मक कार्याबरोबर विविध प्रकल्प तसेच योजनांचा पाऊस सुरू आहे. याचा भाजपला नक्कीच निवडणुकीत लाभ होणार आहे. याच आठवड्यात नूतनीकरण केलेल्या डिचोली बसस्थानकाचे उद्घाटन झाले. या बसस्थानकाची दुरूस्ती पाच वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू होती. काम पूर्वीच पूर्ण व्हायला हवे होते. तरीही आता ते पूर्ण झाले. निवडणुकीपूर्वी नुतनीकृत बसस्थानकाचे उद्घाटन झाले. आणखी एक प्रकल्प भाजप सरकारच्या नावावर जमा झाला. यानंतर पर्वरी फ्लायआवरचे उद्घाटन झाले. हा फ्लायओवर मुदतीपूर्वी झालेला आहे. फ्लायओव्हर मात्र मुदतीत पूर्ण झालेला आहे. पणजी - म्हापसा अंतर फक्त अकरा किमीचे असले तरी वाहतूक कोंडीमुळे प्रवासात बराच वेळ जायचा. सकाळी आणि सायंकाळी तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांचे बरेच हाल व्हायचे. फ्लायओवरमुळे वेळ तसेच इंधनाची बचत होणार आहे. पणजीतील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात अटल सेतू उभारण्यात आला होता. आता म्हापसा - पणजी मार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी फ्लायओवर उभारण्यात आलेला आहे. डिचोली बसस्थानकाच्या उद्घाटना नंतर फ्लायओवर सुरू करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी फ्लायओवरचे उद्घाटन करताना बोरी पुलासह इतर प्रकल्पांची घोषणा केली आहे. निवडणूक आचारसंहितेपूर्वी बोरी पुलाची पायाभरणी केली जाईल. गवंडाळी रेल्वे उड्डाण पुलाचे कामही सुरू आहे. हा उड्डाण पूलही नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. विकासकामांचा धडाका सुरू असताना कल्याणकारी योजनाही सुरू आहेत. निवडणुकीवेळी तीन मोफत सीलींडर देण्याची घोषणा सरकारने केली होती. आता निवडणुकीपूर्वी या योजनेची कार्यवाही सुरू झाली आहे. याशिवाय गृह आधार तसेच दयानंद सामाजीक सुरक्षा योजनेचे पैसे वाढविण्याचे सूतोवाचही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. विकास व आश्वासन पूर्तीच्या मुद्यावर सरकार निवडणुकीला सामोरे जाणार आहे. 

कार्यकर्त्यांची सोय व संघटनेचे कार्य पुढे नेण्यासाठी भव्य अशा कार्यालयाचेही उद्घाटन झालेले आहे. दोन वर्षांपूर्वी या कार्यालयाची पायाभरणी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या अनुशंगाने संकल्प सेवा अभियानाची सुरवात होणार आहे. या निमित्त सर्व मंत्री, आमदार योजना तसेच सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोचविणार आहेत. सांगायचे तात्पर्य म्हणजे विरोधी पक्षांकडून रणनिती विषयी चर्चा सुरू असताना भाजपने मात्र जनसंपर्क साधण्यास सुरवात केली आहे. उद्घाटने तसेच विविध योजनांच्या अनुशंगाने मुख्यमंत्र्यांच्या सभा तसेच बैठका सुरू आहेत. निवडणूक केव्हाही जाहीर झाली तरी भाजपला विशेष तयारी करावी लागणार नाही. मगो बरोबर जागावाटप व उमेदवारांची निवड या दोनच गोष्टी बाकी राहिलेल्या आहेत. उद्घाटने तसेच विविध योजनांच्या निमित्ताने केंद्रीय मंत्री व नेते गोव्याला भेट देऊ लागले आहेत. निवडणुकीचा विचार करता भाजपची तयारी सुसाटपणे सुरू आहे. 

विरोधी पक्षांचा विचार करता सगळीकडे संभ्रमाची स्थिती आहे. कल्याणकारी योजना व विविध प्रकल्प झाले असले तरी जमीन रूपांतरण, ढासळलेली कायदा सुव्यवस्था असे अनेक प्रश्न राज्यात आहेत. टॅक्सीवाल्यांच्या प्रश्नावर तोडगा काढणे अद्याप शक्य झालेले नाही. कॅसिनोंचे मांडवी नदीतून स्थलांतरण झालेले नाही. विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस व अन्य नेत्यानी राज्यात आंदोलन उभारायला हवे होते. घेराव आणि निवेदन देण्या पलीकडे काँग्रेसची मजल जात नाही. भाजप विरोधात लढण्यासाठी काँग्रेस, आप, गोवा फॉरवर्ड व आरजी या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. काँग्रेस - आरजी पक्षात बोलणी सुरू झालेली आहे. गोवा फॉरवर्ड, आप ह्या पक्षांचे काय? गोवा फॉरवर्डने तर चर्चेची बोलणीच बंद केलेली आहेत. भाजपला आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. युती झाली तरी जागा वाटप हा महत्वाचा तिढा असणार आहे. पुन्हा अमित पाटकर याना डिच्चू देऊन गिरीश चोडणकर यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर काँग्रेसमध्येही असंतोषाचे वातावरण आहे. विरोधी आघाडी व विरोधी पक्षांबाबत संभ्रमाची स्थिती आहे. यामुळे आगामी दोन महिने राजकारणाच्या दृश्टीने निर्णायक स्वरूपाचे असणार आहेत.


गणेश जावडेकर, (लेखक भांगरभूय दैनिकाचे मुख्य प्रतिनिधी आहेत)