गोव्यात तसेच देशभरात हल्लीच्या काळात घडलेल्या काही प्रकरणांमुळे पोलीस खाकी वर्दीची प्रतिमा मलीन होताना दिसत आहे. जनसामान्यांत पोलिसांप्रती असलेला आदरभाव आणि मान कुठेतरी ढासळत चालल्याचे दिसत आहे. योग्य प्रशिक्षणाचा अभाव, झटपट पैसे कमवण्याची वृत्ती आणि राजकारण्यांसमोर टाकलेले लोटांगण ही खाकी वर्दीचा दबदबा कमी होण्याची प्रमुख कारणे सध्यातरी मानली जात आहेत. याच कारणामुळे गुन्हेगारीला ऊत आला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.
परवाच झालेल्या पावसाळी विधानसभा अधिवेशनावेळी आमदारांकडून काही पोलिसांचे कर्तृत्व उघडे पाडले गेले. त्यानंतर एका उपनिरीक्षकासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस खात्याकडून कारवाई करण्यात आली. गुन्हे लपवण्यासाठी नागरिकांना धमकावणे, एखाद्या जागरूक नागरिकाने पोलिसांच्या हप्तेखाऊ भ्रष्टाचारावर किंवा लाच घेण्याच्या प्रकारावर आवाज उठवल्यास वरिष्ठांकडून सदर नागरिकाची पिळवणूक करणे, फुकट खाण्याच्या उद्देशाने हॉटेलमालक व कर्मचाऱ्यांना धमकावणे, अशा पोलीस अधिकाऱ्यांचे मित्रसुद्धा स्वतःला पोलीस अधिकारी म्हणवून घेत गावभर डंका फोडतात. तेव्हा कुठेतरी पोलीस सेवा ही गैरमार्गावर जात असल्याचे दिसणे साहजिकच आहे.
शिवाय पोलीस खात्यात चालणारी वशिलेबाजी ही दुसरी मोठी समस्या आहे. बहुतेक पोलीस कर्मचारी हे राजकारणी आणि गँगस्टर यांच्याशी लागेबांधे ठेवून आहेत. आपल्याला हवे त्या वेळी आणि इच्छुक ठिकाणी बदल्या करून घेण्यासाठी या राजकारण्यांचा व गँगस्टर्सचा वापर हे पोलीस करतात. अशा लोकांशी पोलिसांचे जवळचे संबंध असल्याने गुन्हेगारी नियंत्रणात येण्यापेक्षा तिला खतपाणी मिळते.
अशा हप्तेखोर, भ्रष्टाचारी वृत्तीमुळे गुन्ह्यांचा छडा लागत नाही. किंबहुना पोलिसांना हे गुन्हे उघडकीस आणण्यात रस नसतो. एखाद्या बड्या श्रीमंतासोबत गुन्हा घडल्यास सर्व पोलीस यंत्रणा एकवटते. परंतु सामान्य पीडिताला न्याय देण्यासाठी ही यंत्रणा पुढे येण्यापेक्षा गुन्हेगार कसे लपून राहतील याचीच सोय केली जाते.
पोलीस यंत्रणा ही शिस्त काटेखोरपणे जोपासणारी आणि सन्मान देणारी मानली जाते. पण राजकारणी आणि गँगस्टर लोकांच्या हस्तक्षेपामुळे ही खाकी वर्दीची शान ढेपाळत चालली आहे. शिवाय ‘ड्युटी मास्तर’च्या नावाखाली कनिष्ठ आणि वरिष्ठ पोलिसांचा छळ बर्याच पोलीस ठाण्यांत सुरू आहे. जो चिरीमिरी देतो त्यालाच जवळ करायचे, अन्यथा इतरांची प्रतिमा पोलीस इंचार्जसमोर मलीन करून त्यांना वाळीत टाकले जाते. या प्रकारामुळे पोलिसांचे सेवेबद्दलचे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे.
गोवा हे पर्यटन क्षेत्र आहे. पर्यटक इथे सुरक्षित ठिकाण म्हणून येतात. मात्र समुद्रकिनारी परिसरात पोलिसांतर्फेच या पर्यटकांना लुबाडण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या पोलीस खात्याने गृहरक्षक व आयआरबी पोलिसांची ठिकठिकाणी नियुक्ती केलेली आहे. काही युनिट्स तर आयआरबी पोलिसांच्या साहाय्यानेच पोलीस खात्याकडून चालवली जात आहेत. खाकी वर्दीतील पोलिसांप्रमाणेच हे आयआरबी पोलीसदेखील भ्रष्टाचार तसेच इतर गुन्ह्यांमध्ये अडकले गेले आहेत, हे अनेक प्रकरणांवरून अधोरेखित झालेले आहे.
हल्लीच्या काळात पोलिसांना त्यांच्या गणवेशाचा आणि पेहरावाचा सन्मान राहिलेला नाही. योग्य प्रशिक्षणाचा अभाव यातून दिसून येत आहे. एखाद्या खासगी कंपनीच्या बाऊन्सरप्रमाणे पोलीस कर्मचारी आज पोलीस ठाण्यात किंवा समाजात वावरताना दिसत आहेत. यामध्ये वरिष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. भुरटे चोर, तस्कर, दरोडेखोर आणि अनैतिक धंदे चालवणाऱ्या टोळ्यांबरोबरच गुंडांच्या टोळीला साथ देणाऱ्या पोलीस साथीदारांची संख्या वाढत चालली आहे. वाहतूक नियमावली आणि सार्वजनिक ठिकाणी उपद्रवाच्या नावाखाली स्थानिक तसेच पर्यटकांच्या लुबाडणुकीचे प्रकार किनारपट्टीवर तसेच राज्यभर खुलेआम सुरू आहेत.
नाहक जनतेला मारहाण करणे, धाक दाखवणे, राजकारण्यांच्या हातातील बाहुली बनून जनतेला त्रास देणे, अवैध व्यवसायांना प्रोत्साहन देणे, सर्वसामान्य व्यावसायिकांकडून हप्तावसुली करणे आणि तपासाच्या नावाखाली जनतेला गृहीत धरणे, असे प्रकार पोलिसांकडून सुरू आहेत. पोलीस खात्याची जनतेमधील ही मलीन झालेली प्रतिमा पुसून टाकायची असल्यास, त्या दृष्टीने सरकार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल अभ्यास करून योग्य उपाय शोधण्याची नितांत गरज आहे.

उमेश झर्मेकर
(लेखक गोवन वार्ताचे उत्तर गोवा ब्युरो चीफ आहेत.)


