‘जॅक ऑफ ऑल ट्रेड्स, मास्टर ऑफ नन’ (सर्व कामांत हातखंडा, पण एकाचाही पक्का धनी नाही) ही म्हण आपण अनेकदा ऐकतो. ही म्हण अशा व्यक्तींची चेष्टा करण्यासाठी वापरली जाते, जी व्यक्ती अनेक गोष्टींमध्ये ढवळाढवळ करते, पण कशातच पूर्णपणे प्रवीण नसते. पण या म्हणीमागचा खरा इतिहास फार कमी लोकांना ठाऊक आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या, 'जॅक ऑफ ऑल ट्रेड्स' हा शब्द प्रयोग १७ व्या शतकाच्या सुरुवातीला जेफ्रे मिनशुल यांच्या एका पुस्तकात पहिल्यांदा प्रसिद्ध झाला. पण त्याची संपूर्ण म्हण अशी होती "अ जॅक ऑफ ऑल ट्रेड्स इज अ मास्टर ऑफ नन, बट ऑफनटाइम्स बेटर दॅन अ मास्टर ऑफ वन." म्हणजेच, अनेक गोष्टींचे ज्ञान असणारी व्यक्ती कोणत्याही एका विषयात निष्णात नसली, तरी ती अनेकदा एकाच विषयात निष्णात असलेल्या व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ ठरते! काळानुरूप या म्हणीतील सकारात्मक भाग गळून पडला आणि १८ व्या शतकाच्या शेवटी केवळ नकात्मक अर्थ उरला.
या अर्धवट म्हणीमुळे वर्षानुवर्षे लोकांचा असा गैरसमज झाला आहे की, एकाच क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणे श्रेष्ठ आहे. शाळा, नोकरी आणि कुटुंबात आपल्याला नेहमी सांगितले जाते "एकाच गोष्टीवर लक्ष द्या, एकाच वेळी अनेक गोष्टींमध्ये हात घालू नका." परंतु मानशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास, असा विचार मानवी क्षमतेला मर्यादित करतो. एकाच विषयात ज्ञान असणे म्हणजेच यश नव्हे; उलट वेगवेगळ्या विषयांचे ज्ञान असणे ही एक प्रकारची बुद्धिमत्ता आणि ताकद आहे.
आजच्या आधुनिक जगात मग ते काम असो, नातेसंबंध असो, आरोग्य असो वा तंत्रज्ञान ज्या व्यक्तींकडे अष्टपैलू कौशल्ये आहेत, त्या एकाच विषयात निष्णात असलेल्या व्यक्तींपेक्षा अधिक उपयुक्त आणि लवचिक ठरतात.
मानसशास्त्रानुसार, बदलत्या परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता (सायकोलॉजिकल फ्लेक्सिबिलिटी) ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. अष्टपैलू व्यक्तींचे आयुष्य किंवा ओळख एकाच गोष्टीवर अवलंबून नसते. त्यामुळे एका क्षेत्रात अपयश आले तरी त्या खचून जात नाहीत, कारण त्यांची क्षमता वेगवेगळ्या क्षेत्रांत विभागलेली असते.
याचे उत्तम उदाहरण म्हणजे घरातील पालक! एक पालक आचारी, हिशोबनीस, मानसोपचारतज्ज्ञ किंवा डॉक्टर नसले, तरी ते स्वयंपाक करतात, बजेट सांभाळतात, भावनिक आधार देतात आणि मुलांचे शिक्षण व आरोग्यही हाताळतात. हे बहुआयामी कौशल्य संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणि सुरक्षित ठेवते. तसेच ग्रामीण भागातील शिक्षक अनेक विषय शिकवतात, कार्यक्रमांचे आयोजन करतात आणि पालकांशी संवाद साधतात. हे लोक तज्ज्ञ नसले तरी ते संपूर्ण व्यवस्थेला सक्षम ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात.
प्रसिद्ध क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट जॉर्डन पीटरसन यांच्या मते, अशा व्यक्तींकडे समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारची साधने असतात. जेव्हा आयुष्यात अचानक संकटे येतात, तेव्हा या बहुआयामी कौशल्यांचा उपयोग होतो.
'सेल्फ-डिटरमिनेशन थिअरी'नुसार, मानवी मनाला स्वायत्तता, क्षमता आणि संबंध या तीन गोष्टींची गरज असते. जेव्हा आपण वेगवेगळ्या गोष्टी शिकतो, तेव्हा आपल्याला स्वातंत्र्य अनुभवता येते. आमची क्षमता केवळ एकाच कामापुरती मर्यादित न राहता, नवीन गोष्टी शिकण्याच्या आत्मविश्वासात बदलते. तसेच, विविध क्षेत्रांतील लोकांशी जोडल्या गेल्यामुळे आपले सामाजिक संबंध अधिक समृद्ध होतात.
शेवटी, आयुष्यात सर्वात यशस्वी आणि टिकून राहणारी व्यवस्था तीच असते, जी लवचिक आणि बदल स्वीकारणारी असते. म्हणूनच, 'जॅक ऑफ ऑल ट्रेड्स' असणे ही कोणतीही तडजोड किंवा उणीव नाही; तर ती मानवी जीवनाची गुंतागुंत समजून घेणारी एक अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे.

डॉ. उबाल्डिना नोरोन्हा
(सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, सेंट झेविअर्स कॉलेज, म्हापसा)


