युपीएससीसाठी नेमके काय वाचावे आणि अभ्यास कसा करावा?

UPSC पूर्व व मुख्य परीक्षेचा अथांग अभ्यासक्रम सहज सोपा करण्यासाठी अचूक संदर्भ, विषयांची क्रमवार मांडणी, नियमित मनन आणि प्रभावी नोट्स या अत्यंत महत्त्वाच्या रणनीतींचा हा मार्गदर्शक लेख.

Story: यशस्वी भव: |
05th September, 11:14 pm
युपीएससीसाठी नेमके  काय वाचावे आणि  अभ्यास कसा करावा?

युपीएससीच्या पूर्व (Prelims) आणि मुख्य (Mains) अशा दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत विस्तृत अभ्यासक्रम असतो. यामध्ये सामान्य ज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, पर्यावरण, गणित, इंग्रजी आणि चालू घडामोडी यांसारख्या अनेक विषयांचा समावेश होतो. या सर्व विषयांची योग्य तयारी करण्यासाठी सखोल वाचन आणि मनन या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. अभ्यासादरम्यान प्रत्येक विषयाच्या स्वतःच्या विशेष नोट्स काढणे अत्यंत फायदेशीर ठरते, कारण यामुळे वाचलेला विषय व्यवस्थित लक्षात रहातो आणि परीक्षेच्या वेळी उजळणी (Revision) करणे सोपे जाते.

इतिहासाचा अभ्यास करताना सर्व घटनांचा योग्य कालानुक्रम (Chronological Order) समजून घेणे गरजेचे असते. भारताच्या इतिहासाची सुरुवात प्राचीन काळापासून, भरत राजाच्या गोष्टीपासून होते. त्यानंतर आलेल्या विविध राजवटी, त्यांचा विस्तार आणि लय यांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. यानंतर मुघल साम्राज्य, छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, पेशवाई आणि पुढे इंग्रजी सत्ता या सर्व टप्प्यांचा आढावा घ्यावा लागतो. ऐतिहासिक तह, करार आणि त्यांचे परिणाम समजून घेणेही आवश्यक आहे. १८५७ चा उठाव आणि त्याआधीची राजकीय परिस्थिती, महात्मा गांधींचे आगमन, गांधीपूर्व व गांधीोत्तर काळ, तसेच जालियानवाला बाग हत्याकांड, खिलाफत चळवळ आणि १९४७ पूर्वीची व फाळणीपूर्व राजकीय पार्श्वभूमी या सर्व घटना बारकाईने वाचल्या पाहिजेत.

स्वातंत्र्योत्तर भारतातील स्थित्यंतरे, आणीबाणीचा काळ, पंचवार्षिक योजना आणि त्यांची अंमलबजावणी यांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. याशिवाय विज्ञान व तंत्रज्ञानाचा (Science & Technology) विकास, सरकारची कार्यप्रणाली, क्रांतीकारी सरकारी योजना, त्यांचे लाभार्थी, तसेच परराष्ट्रीय धोरणे, विकासाची कामे, तह-करार आणि अणूविषयक धोरणे यांवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. आजकाल युट्यूब, गुगल आणि एन्सायक्लोपिडियावर विपुल माहिती उपलब्ध असली तरी इंटरनेटवरील सर्वच माहिती पूर्णपणे अचूक असेल असे नाही, त्यामुळे माहितीची सत्यता पडताळण्यासाठी NCERT च्या पाठ्यपुस्तकांचा आधार घेऊन घटनांचा क्रम व तथ्यांची खातरजमा करून घ्यावी, तसेच Mrunal.org या संकेतस्थळाचा वापर करावा.

राज्यशास्त्र (Polity) या विषयासाठी श्री. एम. लक्ष्मीकांत यांचे 'Indian Polity' हे पुस्तक अभ्यासासाठी जवळ ठेवावे. या पुस्तकातील संदर्भ आणि सूचीवर आधारित थेट प्रश्न पूर्व आणि मुख्य परीक्षेत विचारले जातात. यामध्ये भारताचा स्वातंत्र्यपूर्व इतिहास, घटना समितीची स्थापना आणि मसुदा समितीचे गठन यांसारख्या मूलभूत गोष्टी समजून घेणे अनिवार्य आहे. वरील सर्व विषयांचा मुळापासून केलेला अभ्यास आणि संकल्पनांची स्पष्टता ही केवळ पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीच नव्हे, तर मुलाखतीसाठी (Interview) देखील अत्यंत उपयुक्त ठरते. एकदा विषयाचा इतिहास आणि संकल्पना नीट कळल्या की त्याचे आकलन वेगाने होते.


अॅड. शैलेश कुलकर्णी, 
कुर्टी - फोंडा
(लेखक नामांकित वकील आणि करिअर समुपदेशक आहेत.)