राज्यभरात सध्या १९८०'चा ट्रेंड बराच जोर धरू लागला आहे. तरुण मंडळींपासून लहान-मोठे, महिला-पुरुष, बाल-वृद्ध सर्वजण कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून सन १९८० मध्ये आपण कसे दिसत असू, याचा मागोवा घेत आहेत. एकविसाव्या शतकातील ही 'क्रेझ' शाश्वत विकासाच्या बाबतीतही दिसून यावी म्हणून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून आपण पारंपरिक पद्धती पुन्हा ट्रेंडमध्ये आणू शकतो का, याचा विचार झाला पाहिजे.
गणेश चतुर्थी हा निसर्गपूजनाचा सण आहे, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. नवजीवन निर्माण करणाऱ्या मृत्तिकेपासून बनवलेली चिकणमातीची मूर्ती, वनातील विविध प्रकारची फळे व वनस्पती वापरून सजवलेली माटोळी, दुर्गम भागांतील रानफुले, रानमाडाच्या झावळ्या, पोय वापरून केलेली सजावट, रानटी कंदमुळे, विविध रानभाज्यांपासून शिजवलेला महानैवेद्य, शेणाने सारवलेली जमीन, परिसर उजळवण्यासाठी पारंपरिक लामणदिव्यांच्या केलेला वापर, नैसर्गिक रंगांनी केलेली रंग-रंगोटी, तसेच पताका लावण्यासाठी पिठापासून तयार केलेला गोंद इत्यादींचा वापर करून शंभर टक्के निसर्गाधारित पद्धतीने साजरा केलेला सण म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गपूजाच होय.
मात्र, एकविसाव्या शतकात या निसर्गपूजेला आधुनिकतेची झळ लागली. पाणी दूषित करणाऱ्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती आल्या. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती असोत किंवा पारंपरिक मूर्ती, त्यांना चकाकी देण्यासाठी रासायनिक रंग वापरात आणले जाऊ लागले. माटोळीला बांधण्यात येणाऱ्या नैसर्गिक फळांची जागा कृत्रिम प्लास्टिक व लाकडी वस्तूंच्या खेळण्यांनी घेतली. प्लास्टिक, सॅटिन, कागद यांसारख्या साहित्यापासून तयार केलेल्या निर्गंध फुलांनी सुगंधी रानफुलांची जागा घेतली. सजावटीसाठी प्रदूषणकारी थर्माकोलचा वापर होऊ लागला. रानभाज्या हळूहळू नामशेष होत गेल्या. तेवणाऱ्या पारंपरिक दिव्यांची जागा विद्युत रोषणाईने घेतली. शेणाने सारवलेल्या मातीच्या जमिनीची जागा काँक्रीटच्या जमिनीने घेतली. नैसर्गिक रंगांची रांगोळी कृत्रिम रंगांनी रंगू लागली. प्लास्टिकच्या पताका आणि रासायनिक गोंद यांसारख्या वस्तूंनी पारंपरिक, निसर्गपूरक पर्यायांची जागा घेतली.
कृत्रिम/अनैसर्गिक साहित्य वापरल्याने पर्यावरणाचे नुकसान होते. खरं म्हणजे, प्रदूषणकारी पर्याय वापरल्याचा परिणाम मनुष्यावर नक्कीच होतो, हे न कळण्याइतका माणूस अशिक्षित राहिलेला नाही. परंतु, आजकाल ‘कळते पण वळत नाही’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कचरा गोळा करणाऱ्या अशिक्षित माणसाला अडाणी म्हणावे की निसर्गात बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्या शिक्षित माणसाला अडाणी म्हणावे, हा देखील एक चर्चेचा विषय आहे. आजकाल चतुर्थीच्या शुभेच्छा देणारे मोठ-मोठे फलक प्लास्टिकवर मुद्रित करून सार्वजनिक ठिकाणी लावलेले दिसतात. सण संपला की ह्या फलकांचे रूपांतर कचऱ्यात होते अन् आपल्याला हे फलक कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पाहायला मिळतात. काळ बदलला, तंत्रज्ञान आले आणि सण साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या. या बदलांच्या ओघात सणामागचा निसर्गाशी असलेला संवाद हरवत गेला, हे मात्र नक्की.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एकविसाव्या शतकात १९८० च्या ट्रेंडचे अनुकरण करणारे आपण, १९८०च्या काळातील शाश्वत व निसर्गपूरक परंपरा पुन्हा अंगीकारण्यासाठीही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करू शकतो का? त्या काळातील पर्यावरणपूरक सणपद्धतींचा मागोवा घेऊन त्यांना आजच्या काळानुरूप नव्याने स्वीकारता येईल का?
आज कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला भूतकाळातील आपले रूप दाखवू शकते; मग त्याच तंत्रज्ञानाच्या मदतीने भूतकाळातील निसर्गपूरक जीवनशैलीही वर्तमानात आणता येणार नाही का? ‘ट्रेंड’ काही दिवसांचा असतो; पण निसर्गाशी जुळलेली परंपरा पिढ्यान्पिढ्या टिकणारी असते. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात केवळ १९८०सारखे दिसण्याचा ट्रेंड न करता, १९८०च्या काळातील निसर्गपूरक परंपरा अंगीकारण्याचा ट्रेंडही सुरू करूया.



