घराकडे चला!”
बाबांनी एवढे दोन शब्द उच्चारले की, समताच्या डोळ्यांसमोर लगेच गावाकडचं घर उभं राहायचं. हिरवीगार शेती, शेतातून वाहणारं पाणी, आंब्यांची झाडं आणि अंगणात वावरणारी आपली माणसं... गाव म्हणजे तिच्यासाठी आठवणींचं एक सुंदर गाठोडंच होतं.
यावेळी मात्र मे महिन्यात गावाला जायचं ठरलं होतं. घराची डागडुजी करायची होती. संध्याकाळी साडेपाचच्या बसने समता, तिचे बाबा माधवराव आणि आई गावाकडे निघाले.
घरी पोहोचल्यावर आईची पाळी सुरू असल्यामुळे ती बाहेरच्या खोलीतच थांबली. बाबा गावातल्या नाटकाला गेले. समता आणि तिचे दादा म्हणजे तिचे आजोबा खालील खोलीत झोपायला गेले.
“दादा, ती ‘मांजरीने खीर खाल्ली’ वाली गोष्ट सांग ना!”
दादा हसले. ती गोष्ट समताला तोंडपाठ होती, तरी दादांच्या आवाजात ती पुन्हा ऐकण्यात तिला वेगळीच मजा वाटायची.
गोष्ट सांगता सांगता दादा तिच्या पायाला तेल चोळत होते. बाहेर आजी-गौरीआवय भांड्यांना गोबर घासत बसली होती. रात्री साडेअकरा-बारा वाजेपर्यंत तिचं हे काम चालायचं.
गावातल्या त्या घराच्या मागची जागा मात्र समताला नेहमीच गूढ वाटायची. पावसाळ्यात तिथे शेती व्हायची; पण उन्हाळ्यात ती मोकळी पडायची. “तिथे भुतं फिरतात,” असं शेजारच्या सुलोचनाकाकू नेहमी सांगायच्या. एकदा तिथे पांढरी सावली दिसल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. गौरीआवयची तर अजून भयानक गोष्ट होती. एकदा रात्री भांडी घासत असताना कोणीतरी तिचा हात ओढला होता! हे सगळं आठवत असतानाच समताला झोप लागली.
रात्रीचे साधारण तीन वाजले असतील.
“अरे, ऐक ना... हे इथे ठेवूया.”
“नको, त्या बाजूला ठेव!”
कुणाचीतरी कुजबुज समताच्या कानावर पडली. तिची झोप उडाली. खिडकीच्या बाहेर जोराचा वारा घोंघावत होता. मध्येच काहीतरी आपटल्याचा आवाज येत होता. समताच्या अंगाला घाम फुटला. भूत!
तिने दादांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण भीतीने आवाजच फुटेना. तिची नजर पुन्हा पुन्हा त्या छोट्याशा खिडकीकडे जात होती. अचानक मोठा आवाज झाला. दादा दचकून उठले.
“अरे देवा! पाऊस!”
ते खिडकी उघडायला गेले. समता मनात म्हणाली, दादा, बाहेर भूत आहे!
दादांनी खिडकीतून बाहेर पाहिलं आणि मोठ्याने हसत म्हणाले, “अरे शंकरकाका! तुम्ही आलात सुद्धा? माझी लाकडं आहेत तिथे. थांबा, मी पण येतो.”
समताने धडधडत्या मनाने खिडकीतून बाहेर पाहिलं. शेजारचे शंकरकाका आणि सुलोचनाकाकू पावसापासून वाळत ठेवलेली लाकडं वाचवण्यासाठी प्लास्टिकने झाकत होते!
समताची भीती एका क्षणात हशात बदलली.



