पणजी :सोमवारी संपूर्ण गोव्यात साजरा होणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी लागणाऱ्या माटोळीच्या साहित्याला यंदा महागाईची झळ बसली आहे. पणजी बाजारात रानफळांचा तुटवडा निर्माण झाल्याने बहुतांश फळांचे दर दुप्पट झाले असून, त्यामुळे काही साहित्य जवळपास गायब झाले आहे.
गोव्यात चतुर्थीला माटोळी हे मुख्य आकर्षण असून तो सणातील महत्त्वाचा घटक मानला जातो. गणपतीच्या मूर्तीवर विविध रानफळे आणि फुले बांधून निसर्गाची पूजा करण्याची परंपरा आहे. त्यासाठी पणजी बाजारात शनिवारी माटोळीचे साहित्य दाखल झाले असून, खरेदीसाठी गेल्या दोन दिवसांपासून नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, दरवाढीमुळे ग्राहकांना यंदा अपेक्षेपेक्षा अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
- ‘घागऱ्या’ : १५० रुपये नग
- कांगला, फागला, नाक्शी, खुळखुळो आणि माट्ट्यो : १०० रुपये जोडी
- ‘हरण’ रानफूल : १०० रुपये जुडी
गेल्या वर्षी या साहित्याचे दर निम्मे होते. दरम्यान, ‘हरण’ हे रानफुलही आता दुर्मिळ झाले असून, डझनभर विक्रेत्यांपैकी केवळ दोन-तीन जणांकडेच ते उपलब्ध आहे. पूर्वी ५० रुपयांत दोन जुड्या मिळणाऱ्या हरणाचा दर आता १०० रुपये जुडी झाला आहे.
रानफळांचे दर वाढले
इतर रानफळांमध्ये मावळिंग ३०० रुपये, तोरिंग व अननस आकारानुसार १०० ते १५० रुपये दराने विकले जात आहेत. ‘कात्रो’ची किंमत आकारानुसार ७००, ८०० ते १२०० रुपये आहे.
देवाचा नारळ (देवयल्लो) १०० ते २०० रुपये, केळीचा घड ३५० ते ५०० रुपये, दुधी ८० ते १०० रुपये, तर आंबाडे १०० रुपयांना १२ नग या दराने मिळत आहेत. तसेच, गावठी लिंबू ५० रुपये नग आणि मोयंडोळीच्या केळाच्या फेणीची किंमत ३०० रुपये आहे.
रानफळांचा साठा घटला
यंदा रानफळांचा साठा बराच कमी आला आहे. गावातील लोक जंगलात जाऊन ही फळे गोळा करून देतात. मात्र, जंगलात रानफळांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटल्याने बाजारात कमी माल आला आहे.
पुरवठा घटल्यामुळे बहुतांश रानफळांचे दर दुप्पट झाले आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.


