धक्कादायक! कोठडीत असलेल्या प्रज्वल रेवण्णाचा मोबाइल जप्त! त्यात सापडले अश्लील क्लिप्स,चॅट्स,ओटीटी चित्रपट

बंगळुरू कारागृहात लैंगिक अत्याचारप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी सापडला आहे. तो वास्तव्यास असलेल्या कोठडीतून मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गजेट्स जप्त करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या मोबाइलमध्ये १४५ हून अधिक अश्लील क्लिप्स होत्या. प्रज्वल रेवण्णाच्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच गुन्हे शाखेने कारागृह रक्षकांच्या मदतीने चालणाऱ्या प्रतिबंधित वस्तूंची तस्करी करणारे सिंडीकेटचा भांडाफोड करून लाखो रुपयांचे मोबाईल जप्त केले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
1 hours ago
धक्कादायक! कोठडीत असलेल्या प्रज्वल रेवण्णाचा मोबाइल जप्त! त्यात सापडले अश्लील क्लिप्स,चॅट्स,ओटीटी चित्रपट

बंगळुरू :  येथील परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा विभागात सुरू असलेल्या एका मोठ्या बेकायदेशीर रॅकेटचा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या (CCB) धडक तपासानंतर पर्दाफाश झाला आहे. बलात्काराच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला माजी खासदार प्रज्वल रेवण्णा आणि बाल लैंगिक अत्याचार (पोक्सो) प्रकरणात अंडर ट्रायल कैदी  प्रताप राय ज्या कोठडीत आहेत, तेथून एक मोबाईल फोन, सिम कार्ड, चार्जर आणि एक डायरी जप्त करण्यात आली आहे.

फॉरेन्सिक विश्लेषणात या मोबाईलमध्ये १४५ हून अधिक अश्लील व्हिडिओ क्लिप्स, ओटीटी (OTT) वरील चित्रपट व मालिका साठवल्याचे आढळले आहे. तसेच त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये १०० हून अधिक क्लिप्स मिळून आल्या. तपासादरम्यान फोनच्या कॉल डिटेल्सवरून प्रज्वल रेवन्ना यांनी मध्यस्थांच्या माध्यमातून कुटुंबातील सदस्यांशी तसेच एका महिला मैत्रिणीशी थेट बेकायदेशीर संपर्क साधल्याचे तांत्रिक विश्लेषणात निष्पन्न झाले आहे.

तपास आणि फॉरेन्सिक अहवालातील धक्कादायक खुलासे

११ ऑगस्ट रोजी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सीसीबीच्या पथकाने मध्यवर्ती कारागृहातील सेक्युरिटी डिव्हिजनच्या बराकीत अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान एका कोठडीतून सॅमसंग मोबाईल फोन, सिम कार्ड, चार्जर आणि फोन नंबर नोंदवलेली एक डायरी हस्तगत करण्यात आली. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या (FSL) अहवालानुसार, मोबाईलमध्ये १४५ पेक्षा जास्त व्हिडिओ क्लिप्स, अश्लील साहित्य आणि विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील लोकप्रिय मालिका व चित्रपट साठवले होते. पेन ड्राईव्हमध्येही १०० पेक्षा अधिक अशाच क्लिप्स आढळल्या.रेवण्णा यांने कारागृहाबाहेरील व्यक्तींशी, विशेषतः मध्यस्थांच्या मदतीने कुटुंबातील सदस्यांशी आणि एका जवळच्या महिला मैत्रिणीशी थेट संभाषण केल्याचे तपासात स्पष्ट झाले. हस्तगत केलेल्या डायरीमध्ये ६ ते ७ महत्त्वाचे संपर्क क्रमांक नोंदवलेले आढळले. रेवण्णा याने हा मोबाईल आपला नसल्याचा दावा करत तो बराकीतील कैदी आलटून-पालटून वापरत असल्याचे सांगितले; परंतु डायरी स्वतःची असल्याचे त्याने कबूल केले. पोलीस आता डायरीतील सर्व क्रमांकांवर नोटीस पाठवून त्यांची चौकशी करत आहेत.

कारागृहात फोन आणि सिम कार्ड पोहोचवण्यासाठी कार्यरत होती टोळी

पोलिसांनी रेवण्णाच्या प्रकरणाचा सखोल तपास करून प्रतिबंधित वस्तू (Contraband) पुरवणाऱ्या टोळीचा माग काढला. तपासादरम्यान ही उपकरणे कारागृहात पोहोचवण्यासाठी एक मोठी सिंडीकेट कार्यरत असल्याचे समोर आले. बाहेरील बाजारात सुमारे १० हजार रुपये किमतीचा असलेला हा फोन नवीन कुमार नावाच्या व्यक्तीने खरेदी केला होता. तो फोन त्याने खुनाच्या गुन्ह्यातील अंडर ट्रायल कैदी मंजुनाथकडे सोपवला आणि मंजुनाथने कारागृह रक्षक (वॉर्डन) प्रकाश गावडे याच्या मदतीने तो सेक्युरिटी डिव्हिजनच्या बराकीत पोहोचवला.

दुसरीकडे, आंध्र प्रदेशात नोंदणीकृत आणि कर्नाटकात रोमिंगवर असलेले सिम कार्ड मोहम्मद तौसीफ या कैद्यासाठी सादिक नावाच्या व्यक्तीने (ज्याचा बाप कारागृहात कैदी आहे) बंगळुरू येथून खरेदी केले होते. तौसीफला तापाच्या उपचारासाठी व्हिक्टोरिया रुग्णालयात नेण्यात आले असता, तेथे त्याला हे सिम कार्ड देण्यात आले. तौसीफने हे सिम कार्ड कार्बन पेपरमध्ये गुंडाळून, सेलोटेपने सील केले आणि आपल्या तोंडात लपवून ठेवले. कारागृहाच्या प्रवेशद्वारावर 'हँड-हेल्ड मेटल डिटेक्टर'ने तपासणी करताना कार्बन पेपरमुळे ते डिटेक्ट झाले नाही आणि सिम कार्ड सहजरीत्या आत पोहोचले. हे सिम कार्ड एप्रिल महिन्यानंतर कारागृहात आणले गेले होते.

रॅकेटचे अर्थकारण आणि लाखो रुपयांची उलाढाल

बाहेर केवळ १०,००० रुपयांना मिळणारा मोबाईल फोन कारागृहात कैद्यांना ७५,००० रुपये ते २ लाख रुपयांपर्यंत विकला जात होता, तर एक सिम कार्ड ७,००० ते ८,००० रुपयांना विकले जात होते. या व्यवहारांचे पैसे कारागृहाबाहेर नातेवाईक किंवा मध्यस्थांमार्फत चुकवले जात असत. इतक्या मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या नफ्यामुळे कारागृहातील तपासणी करणाऱ्या (फिस्कर्स) कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

प्रकरणातील अटक आणि कारवाईची स्थिती

इलेक्ट्रॉनिक सिटी विभाग पोलिसांनी या प्रकरणात परप्पना अग्रहारा पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) नोंदवून आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. नवीन कुमार, मंजुनाथ, सादिक आणि मोहम्मद तौसीफ यांना २४ ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. वॉर्डर प्रकाश गावडे याला २४ ऑगस्ट रोजी अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर वॉर्डर श्रीनिवास नाईक आणि मुख्य वॉर्डन विजय कुमार यांना २९ ऑगस्ट रोजी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. याशिवाय, प्रताप राय आणि प्रज्वल रेवण्णा यांना १० सप्टेंबरपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, ज्यानंतर त्यांची रवानगी पुन्हा न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

२० हून अधिक फोन तस्करीत दोन वॉर्डनचा थेट सहभाग

तांत्रिक तपासणीदरम्यान (CEIR द्वारे) इतर दोन गुन्ह्यांचा उलगडा झाला, ज्यामध्ये वर्षभरात २० हून अधिक मोबाईल फोन कारागृहात पुरवण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. १३ जानेवारी रोजी इन-चार्ज अधीक्षकांच्या तक्रारीवरून ४ मोबाईल, २ सिम कार्ड आणि चार्जर जप्त करण्यात आले होते. तपासात वॉर्डन श्रीनिवास नाईक याने 'राहुल' या बनावट नावाने सुमारे १२ फोन खरेदी करून कैद्यांना दिल्याचे उघड झाले, ज्यानंतर नाईकला २८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली.

तसेच २० ऑगस्ट रोजी जप्त केलेला मोबाईल मुख्य वॉर्डर विजय कुमार याने कैदी भरत (उर्फ केटीएम भरत) याच्या सांगण्यावरून आत आणल्याचे निष्पन्न झाले, ज्यामुळे विजय कुमारलाही २८ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. कर्नाटक कारागृह विभागाच्या आकडेवारीनुसार, या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत राज्यातील विविध कारागृहांतून सुमारे ३०० मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. पोलीस प्रशासन आता सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या सहभागाची सखोल चौकशी करत आहे.


हेही वाचा
सर्व पहा