मडगाव रेल्वे स्थानकावर १२ संशयित ताब्यात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष सुरक्षा मोहीम

Story: गोवन वार्ता। प्रतिनिधी |
1 hours ago
मडगाव रेल्वे स्थानकावर १२ संशयित ताब्यात

मडगाव : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यासाठी कोकण रेल्वे पोलिसांनी मडगाव रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम राबविली. या मोहिमेदरम्यान स्थानक परिसरात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

तपासणीदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींकडे कोणतीही वैध ओळखपत्रे किंवा रेल्वे प्रवासाची तिकिटे आढळून आली नाहीत. त्यामुळे त्यांना पुढील चौकशी व ओळख पडताळणीसाठी मडगाव येथील कोकण रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

चौकशीदरम्यान संबंधित व्यक्तींना त्यांच्या रेल्वे स्थानकावर उपस्थितीबाबत कोणताही वैध पुरावा सादर करता आला नाही. त्यांच्या संशयास्पद हालचालींच्या पार्श्वभूमीवर संभाव्य गुन्हेगारी कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम ३५(१) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी सर्व १२ जणांना मडगावच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. चौकशीअंती उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी त्यांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका केली.

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे स्थानक परिसरात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी कोकण रेल्वे पोलिसांकडून तपासणी आणि गस्त वाढवण्यात आली आहे.