काँग्रेस आणि भाजपला 'गोवा फर्स्ट' ठरणार सक्षम पर्याय : अरविंद केजरीवाल

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 'आप' आणि 'गोवा फॉरवर्ड'ने एकत्र येत 'गोवा फर्स्ट' आघाडीची घोषणा केली. ही आघाडी भाजप व काँग्रेसविरहित असून पक्षांतर आणि जमीन रूपांतरण आणि गोव्याच्या जनतेच्या हितासाठी लढणार आहे, असे विजय सरदेसाई म्हणाले.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
काँग्रेस आणि भाजपला 'गोवा फर्स्ट' ठरणार सक्षम पर्याय : अरविंद केजरीवाल

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकारणात एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून विरोधी पक्षांच्या एकजुटीबाबत चर्चा सुरू असतानाच, गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आम आदमी पार्टी (आप) आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने एकत्र येत 'गोवा फर्स्ट' या नव्या राजकीय आघाडीची अधिकृत घोषणा केली आहे. ही आघाडी भाजपसोबतच काँग्रेससाठीही मोठा धक्का मानली जात असून, दोन्ही पक्षांतील नाराज नेते यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

'आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. या प्रसंगी 'आप'च्या गोवा प्रभारी आतिशी यांच्यासह दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. ही आघाडी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांविरोधात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले, "काँग्रेस हा पक्षांतर करणाऱ्यांचा पक्ष बनला असून जनता त्याचा तिरस्कार करते. भाजपवर नाराज असलेले मतदार 'आप'ला मतदान करू शकतात, परंतु ते काँग्रेसला कधीही मतदान करणार नाहीत. त्यामुळे 'गोवा फर्स्ट' ही भाजप आणि काँग्रेसला एक सक्षम पर्याय ठरेल."

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी ही आघाडी पक्षांतराच्या (डिफेक्शन) विरोधात असल्याचे स्पष्ट केले. गोमंतकीय जनतेने भाजप आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला, परंतु दोन्ही पक्षांनी पक्षांतराला खतपाणी घातले. पक्षांतर, बेकायदेशीर जमीन रूपांतरण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न याविरोधात ही आघाडी संघर्ष करेल. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांच्यासह काँग्रेस व भाजपमधील अनेक असंतुष्ट नेते आणि स्वतंत्र विचारसरणीच्या व्यक्ती लवकरच 'गोवा फर्स्ट' आघाडीत प्रवेश करतील, असा दावाही सरदेसाई यांनी केला.

हेही वाचा
सर्व पहा