सहारनपूर : ७० कोटींची २० रुपयांची बनावट नाणी चलनात; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

पाच जणांना अटक; यंत्रसामग्रीही जप्त :टोळी उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहार या राज्यांमध्ये सक्रिय;सहारनपूरमधील राष्ट्रीयीकृत बँकेच्या चलन साठवण केंद्रातून १७.२९ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच बनावट नाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दारू दुकाने, टोलनाके आणि किराणा दुकानांच्या माध्यमातून तब्बल ७० कोटी रुपये किमतीची बनावट २० रुपयांची नाणी चलनात आणल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये उघडकीस आला आहे. सहारनपूर पोलिसांनी टिटरोन परिसरात कारवाई करून बनावट नाणी तयार करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक केली. आरोपी नवीन बनावट नाणी निर्मिती केंद्र सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागले.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 mins ago
सहारनपूर : ७० कोटींची २० रुपयांची बनावट नाणी चलनात; आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

सहारनपूर : सहारनपूरमधील राष्ट्रीयीकृत बँकेच्या चलन साठवण केंद्रातून १७.२९ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच बनावट नाण्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. दारू दुकाने, टोलनाके आणि किराणा दुकानांच्या माध्यमातून तब्बल ७० कोटी रुपये किमतीची बनावट २० रुपयांची नाणी चलनात आणल्याचा  धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये उघडकीस आला आहे. सहारनपूर पोलिसांनी टिटरोन परिसरात कारवाई करून बनावट नाणी तयार करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक केली. आरोपी नवीन बनावट नाणी निर्मिती केंद्र सुरू करण्यासाठी यंत्रसामग्री घेऊन जात असताना पोलिसांच्या हाती लागले.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही टोळी उत्तर प्रदेश, पंजाब आणि बिहार या राज्यांमध्ये सक्रिय होती. आरोपींकडे दररोज १० हजार ते १२ हजार बनावट नाणी तयार करण्याची क्षमता होती. तयार केलेली नाणी कमिशनच्या आधारावर बाजारात वितरित केली जात होती. यामध्ये दारू दुकाने हा टोळीचा प्रमुख बाजार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

६,४०० बनावट नाणी जप्त

पोलिसांनी आरोपींकडून ६,४०० बनावट २० रुयांची नाणी जप्त केेली. या नाण्यांची किंमत १.२८ लाख रुपये आहे. याशिवाय सुमारे ५ लाख रुपये किमतीची अर्धवट तयार नाणी आणि सहा नाणी तयार करणारी यंत्रेही जप्त केली आहेत. 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा कथित म्होरक्या उपकर लुथरा ऊर्फ अभय प्रताप ‌सिंह याचा समावेश आहे. तो पंजाबमधील मोहाली येथे पूर्वी सोनार म्हणून काम करत होता. पन्नाशीतील लुथरा हा २००१ पासून बनावट नाण्यांच्या व्यवसायात सक्रिय असल्याचा पोलिसांचा दावा आहे. २०१७ मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात कारवाई केली होती. त्याच्या अटकेसाठी एक लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते.

इतर आरोपींमध्ये सहारनपूरचा हिमांशू ऊर्फ गुल्लू, मुझफ्फरनगरचा कुलदीप, भदोहीचा अनुराग पाल ऊर्फ लंकेश आणि बिहारचा संतोष चौरसिया ऊर्फ जनार्दन यांचा समावेश आहे. त्यांचे वय ३० ते ४० वर्षांच्या दरम्यान आहे.

एका नाण्याची निर्मिती ५ ते ६ रुपयांत

पोलिसांच्या चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, एका बनावट नाण्याच्या निर्मितीसाठी ५ ते ६ रुपये खर्च येत होता.  त्यानंतर ही नाणी एजंटना १२ ते १५ रुपये प्रति नाणे या दराने पुरवली जात होती. एजंटच्या माध्यमातून ही नाणी दारू दुकाने, टोलनाके आणि किराणा दुकानांमध्ये चलनात आणली जात होती. पोलिसांनी जप्त केलेल्या नाण्यांच्या आधारे नव्हे, तर आरोपींनी यापूर्वी बाजारात वितरित केलेल्या बनावट नाण्यांच्या अंदाजित किमतीवरून ७० कोटी रुपयांचा आकडा निश्च‌ित करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. 

तुरुंगात झाली टोळीची सुरुवात

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नेटवर्कमध्ये एकूण आठ जणांना वेगवेगळी कामे सोपवण्यात आली होती. काही जण यंत्रसामग्रीची व्यवस्था करून उत्पादनावर लक्ष ठेवत होते, तर काही जण तयार नाणी एजंटपर्यंत पोहोचवून बाजारात वितरित करण्याचे काम करत होते. त्यामुळे एखादा सदस्य पकडला गेला तरी संपूर्ण नेटवर्क उघड होऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

टोळीचा म्होरक्या उपकर लुथरा याची तिहार तुरुंगात हिमांशू ऊर्फ गुल्लूशी ओळख झाली. त्यानंतर या नेटवर्कची पायाभरणी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढे इतर आरोपीही वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये या दोघांच्या संपर्कात आल्यानंतर टोळीत सहभागी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

हरियाणातून सहारनपूरला स्थलांतराची तयारी

या टोळीने यापूर्वी हरियाणात बनावट नाणी तयार करण्याचे केंद्र चालवले होते. आता हे काम सहारनपूरमध्ये हलवून नवीन निर्मिती केंद्र सुरू करण्याची त्यांची तयारी होती. पोलिसांनी जप्त केलेली यंत्रे जुनी असून त्यांचा यापूर्वी वापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

आठ मोबाइल, सात खातेवह्या पोलिसांच्या हाती

पोलिसांनी आठ मोबाइल फोन, सात खातेवह्या आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. या आधारे टोळीचे एजंट, आर्थिक व्यवहार आणि बनावट नाण्यांचे वितरण यांचा तपास सुरू आहे.

जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये पाच लोखंडी डाय, ३९ विनामोहर डाय, २० मोहर असलेले डाय, डाय पॉलिशिंग मशीन, दोन ग्राइंडिंग स्टोन, पाच हातोडे, लोखंड कापण्याची करवत आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा यांचा समावेश आहे.

बॅंकेच्या चलन साठवण केंद्रातून १७.२९ कोटींच्या बनावट नोटा जप्त

दरम्यान, सहारनपूरमधील राष्ट्रीयीकृत बँकेच्या चलन साठवण केंद्रातून १७.२९ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याच्या घटनेनंतर काही दिवसांतच बनावट नाण्यांच्या या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बनावट नोटांच्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) करत असून आतापर्यंत एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

बनावट नाण्यांचे उत्पादन किती काळापासून सुरू होते आणि या नेटवर्कमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सहारनपूर पोलिसांकडून सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा