बेळगाव: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गोव्याहून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. बेळगाव शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर जाणाऱ्या प्रमुख मार्गांवर १९ तपासणी नाके उभारण्यात आले असून, तेथे चोवीस तास वाहनांची सखोल तपासणी केली जाणार आहे.
गोवा आणि कर्नाटक या दोन राज्यांतील दारूच्या किमतीत असलेल्या मोठ्या फरकामुळे गोवा-बेळगाव मार्गावरून बेकायदा दारूची तस्करी वाढण्याची शक्यता असते. हे आव्हान लक्षात घेऊन पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त समन्वयाने कारवाईची रणनीती आखली आहे.
यंदा बेळगाव शहरात एकूण १,१५६ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना झाली असून, यामध्ये २१ नवीन मंडळांचा समावेश आहे. ४ सप्टेंबरपासून सुरू झालेले गणेशमूर्तींचे आगमन आता पूर्ण झाले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहराची ३२ विभागांमध्ये विभागणी करण्यात आली असून, प्रत्येक विभागाची जबाबदारी पीएसआय आणि एएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. ही संपूर्ण यंत्रणा तीन डीसीपी, सहा सीपीआय आणि सहा एसीपी यांच्या थेट देखरेखीखाली कार्यरत राहील. शहरातील १२० प्रमुख ठिकाणी आणि प्रत्येक गणेश मंडपात तीन शिफ्टमध्ये किमान दोन पोलीस कर्मचारी २४ तास तैनात असणार आहेत.
अतिसंवेदनशील भागांवर देखरेख ठेवण्यासाठी १,२६० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच, अतिरिक्त सुरक्षेसाठी सीएआर, केएसआरपी आणि आरएएफच्या तुकड्या तैनात करून संवेदनशील भागात संचलन (रूट मार्च) केले जात आहे. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी २४ सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले असून, १,०९९ रेकॉर्डवरील गुन्हेगारांकडून प्रतिबंधात्मक हमीपत्र लिहून घेतले आहे. गणेशमूर्तींच्या प्रतिष्ठापना आणि विसर्जनाच्या दिवशी शहरात संपूर्ण दारू विक्री बंद (ड्राय डे) राहील, असे स्पष्ट करत आयुक्तांनी नागरिकांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.


