राज्यातील अमली पदार्थांच्या गुन्ह्यात ५६ टक्के गुन्हेगार परप्रांतीय

पाच वर्षांत ९०१ आरोपींना अटक : स्थानिक, विदेशी गुन्हेगारांच्या संख्येतही वाढ

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th September, 07:28 pm
राज्यातील अमली पदार्थांच्या गुन्ह्यात ५६ टक्के गुन्हेगार परप्रांतीय

राज्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये अन्य राज्यांतील गुन्हेगारांचा सहभाग वाढत असल्याचे समोर आले आहे. २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या कालावधीत अशा गुन्ह्यांत अटक झालेल्या परप्रांतीय आरोपींच्या संख्येत १८ टक्क्यांची वाढ झाली आहे. एकूण अटकेतील निम्म्याहून अधिक आरोपी परप्रांतीय असून, कारवाईत स्थानिक आणि विदेशी नागरिकांच्या अटकेचे प्रमाणही लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून आले आहे. या कालावधीत एकूण अटक झालेल्यांपैकी ५५.९३ टक्के परप्रांतीय होते.

पाच वर्षांत ९०१ आरोपींना अटकगेल्या पाच वर्षांच्या कालावधीत अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांत एकूण ९०१ आरोपींना अटक करण्यात आली. यापैकी ५०४ म्हणजेच ५५.९३ टक्के अन्य राज्यांतील, २६९ म्हणजेच २९.८५ टक्के स्थानिक, तर १२८ म्हणजेच १४.२० टक्के विदेशी नागरिक होते.

या कालावधीत स्थानिक तसेच विदेशी नागरिकांच्या अटकेतही मोठी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये पोलिसांनी २९ स्थानिकांना अटक केली होती; २०२५ मध्ये ही संख्या वाढून ७८ झाली. ही वाढ तब्बल १६८ टक्के आहे.

पोलिसांनी २०२१ मध्ये अमली पदार्थांच्या गुन्ह्यांत अन्य राज्यांतील ८७ जणांना अटक केली होती. २०२५ मध्ये ही संख्या वाढून १०३ झाली. तसेच, २०२१ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या २२ विदेशी नागरिकांना अटक करण्यात आली होती. २०२५ मध्ये ही संख्या वाढून ३२ झाली असून, विदेशी नागरिकांच्या अटकेतील ही वाढ ४६ टक्के आहे.

पाच वर्षांत ७४० खटले दाखल

पोलिसांनी या पाच वर्षांच्या काळात अमली पदार्थांशी संबंधित ७४० खटले दाखल केले आहेत. यामध्ये २०२५ मधील सर्वाधिक १६३ खटल्यांचा समावेश आहे.

तसेच, या पाच वर्षांत पोलिसांनी सुमारे १४६ किलोंहून अधिक अमली पदार्थ नष्ट केले आहेत. यात सर्वाधिक ७५ किलो अमली पदार्थ २०२५ मध्ये नष्ट करण्यात आले. तर, २०२३ मध्ये १.१० कोटी रुपये किमतीचे २१.९१ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले होते.

पोलिसांच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर
  1. गोवा हे पर्यटन राज्य असल्याने येथे अमली पदार्थांची तस्करी करून आणण्याचे प्रमाण अधिक आहे. हे रोखण्यासाठी गोवा पोलिसांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
  2. ठिकठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पोलिसांतर्फे बार आणि रेस्टॉरंटमध्ये अचानक तपासणी केली जात आहे.
  3. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शिवाय शाळा, महाविद्यालयांत अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृतीही केली जात आहे.
हेही वाचा
सर्व पहा