पणजी: पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक कॅसिनो’चे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणाला आता अत्यंत खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी अर्पितराज नागा याने एका व्हिडिओद्वारे धक्कादायक दावा केला आहे. नायक यांनीच आपणास १० कोटी रुपयांचे आमिष दिले होते. त्यांनीच हा बनावट गोळीबार घडवून आणल्याचे नागाने या व्हिडिओत म्हटले आहे. सध्या क्राईम ब्रँच या व्हिडिओची सत्यता तपासत आहे.
संशयित अर्पितराज नागाने व्हिडिओत स्पष्ट केले की, श्रीनिवास नायक यांनी १० कोटी रुपयांचे आमिष दाखवून स्वतःवर गोळीबार करण्यास सांगितले होते. या घटनेत कोणीही जखमी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आणि नायक यांच्या सुरक्षारक्षकांकडूनही प्रत्युत्तरात गोळीबार केला जाईल अशा सूचना देण्यात आल्या होत्या. अडचणीच्या वेळी 'पप्पी' नावाच्या व्यक्तीचा उल्लेख करण्यास सांगण्यात आले होते; मात्र आपण या पप्पीला ओळखत नाही, असा खुलासा नागाने केला. गेल्या वर्षभरात तो अनेकदा या कॅसिनोमध्ये आला होता आणि मास्क घातलेले व्यक्ती त्याला पैसे पुरवत असत. ठरल्यानुसार २८ ऑगस्ट रोजी हा गोळीबार घडवून आणला. कोणालाही दुखापत करण्याचा इरादा नव्हता, परंतु या प्रकरणाला इतके गंभीर वळण मिळेल याची कल्पना नव्हती. तसेच १० कोटींचे आश्वासन देऊन केवळ २५ लाख रुपयेच मिळाल्याचा आरोप नागाने केला आहे. आता आपला न्यायालयावर विश्वास असून,
आपण तिथेच आत्मसमर्पण करणार आणि पूर्ण सत्य सर्वांसमोर उघड करू असे तो म्हणाला.
२८ ऑगस्ट रोजी रात्री ८.४७ वाजता निओ मॅजेस्टिक कॅसिनोतून बाहेर पडताना श्रीनिवास नायक यांच्यावर दोघांनी गोळीबार केला होता. प्रत्युत्तरात अंगरक्षकांनीही गोळ्या झाडल्या, परंतु यात कोणीही जखमी झाले नव्हते. या घटनेमुळे राज्यभर खळबळ माजली होती आणि याचे पडसाद गोवा विधानसभा अधिवेशनातही उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवला. क्राईम ब्रँचने मुंबई आणि उत्तर प्रदेशातून आतापर्यंत चार जणांना अटक केली असून, मुख्य शूटर बाबू उर्फ इसार अली याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने गोव्यात आणण्यात आले आहे. सध्या क्राईम ब्रँच दुसऱ्या शूटरचा शोध घेत असून या नवीन व्हिडिओच्या आधारे पुढील तपास वेगाने सुरू आहे.


