मडगाव: दक्षिण गोव्यातील प्रसिद्ध कोलवा परिसरात बेकायदा रेड्यांच्या झुंजीचे (धिरयो) आयोजन केल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, १३ सप्टेंबर रोजी कोलवा येथील एका सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या मनोरंजनासाठी दोन अज्ञात व्यक्तींनी दोन रेड्यांमध्ये झुंज लावली होती. या धिरयोदरम्यान रेड्यांना एकमेकांशी प्राणघातक पद्धतीने लढण्यासाठी प्रवृत्त करून त्यांचा अत्यंत क्रूरपणे छळ करण्यात आला. तसेच तेथे उपस्थित प्रेक्षकांना आणि लोकांनाही या बेकायदा झुंजीसाठी चिथावणी व प्रोत्साहन देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अनिल कृष्णा यांनी स्वतः सरकारच्या वतीने वादी बनून तक्रार नोंदवली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याचे कलम ११(१)(एम)(एन), भारतीय न्याय संहितेचे (BNS) कलम ११२ तसेच 'गोवा, दमण आणि दीव सार्वजनिक जुगार बंदी कायद्या'च्या कलम ११ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल कृष्णा स्वतः करत आहेत.


