गोव्यात राजकीय समीकरणांना नवी दिशा: काँग्रेसची विरोधी आघाडीची मोर्चेबांधणी, 'गोवा फॉरवर्ड'चा पलटवार

गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसकडून विरोधकांना एकत्र आणून आघाडी निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना, गोवा फॉरवर्डने काँग्रेसवर निशाणा साधला आहे, तर भाजपने आपल्या विकासकामांवर विश्वास व्यक्त केला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
गोव्यात राजकीय समीकरणांना नवी दिशा: काँग्रेसची विरोधी आघाडीची मोर्चेबांधणी, 'गोवा फॉरवर्ड'चा पलटवार

पणजी : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गोव्याच्या राजकीय पटलावर अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडत आहेत. गेल्या आठवड्याभरात भाजपमधील पक्षांतर्गत अस्वस्थता, माजी मंत्री निलेश काब्राल यांनी पक्षातील गटबाजीवर सोडलेले शब्दबाण आणि दुसरीकडे सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी विरोधी पक्षांची सुरू असलेली जुळवाजुळव यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आता विरोधी पक्षांमधील परस्परविरोधी वक्तव्ये आणि भाजपच्या नेत्यांची आक्रमक भूमिका निवडणुकांपूर्वी अधिक तीव्र झाली आहे.

काँग्रेसचे आघाडीचे गणित आणि चोडणकरांचा दावा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी गोव्याच्या व्यापक हितासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून 'गोव्याचे हित' हीच प्राथमिकता मानत काँग्रेसने पुढाकार घेतला असून रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीसोबत (RGP) आघाडीबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. काँग्रेसकडे सध्या २५ ते ३० टक्के भक्कम मतांचा पाया असून, त्यात आरजीपीची मते जोडली गेल्यास ४० टक्क्यांहून अधिक मतांची टक्केवारी गाठून भाजपचा पराभव करणे सहज शक्य होईल, असा दावा त्यांनी केला. तसेच फातोर्डा मतदारसंघात काँग्रेस पक्ष विजयाच्या ईर्षेनेच निवडणुकीच्या मैदानात उतरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • गोवा फॉरवर्डचा काँग्रेसवर जोरदार पलटवार
  • गिरीश चोडणकर यांच्या विधानांवर गोवा फॉरवर्ड पक्षाने अत्यंत कडक शब्दांत उत्तर दिले आहे. "जेव्हा एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून मुख्यमंत्री आणि भाजपशी थेट दोन हात करण्याऐवजी विरोधी पक्षाच्या सर्वात आक्रमक आमदारालाच लक्ष्य केले जाते, तेव्हा 'गोव्याचे रक्षण करण्याच्या' त्या पक्षाच्या खऱ्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. गोव्यात आता 'गोवा फर्स्ट' हाच भाजपला एकमेव खरा प्रतिस्पर्धी उरला आहे, अशा आशयाची पोस्ट गोवा फॉरवर्ड पक्षाने केली आहे.

फातोर्ड्यात भाजप आक्रमक; दामू नाईक निवडणुकीसाठी सज्ज

फातोर्डा मतदारसंघातील भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार दामू नाईक यांनी पक्षाच्या आदेशाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचे सांगत निवडणुकीत जोमाने उतरण्याचे संकेत दिले आहेत. जनसंघापासून कार्यकर्त्यांच्या त्यागावर उभा राहिलेला भाजप हा "प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" या तत्त्वावर चालतो, असे सांगत पक्षाने आदेश दिल्यास आपण पुन्हा फातोर्ड्यातून निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, फातोर्ड्याचे स्थानिक आमदार गेल्या १५ वर्षांत पायाभूत सुविधा, रोजगाराच्या संधी आणि विकासप्रकल्प पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

'डबल इंजिन' सरकारच्या कामगिरीवर भाजप ठाम

या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले की, निवडणुकीच्या ६ महिने आधी राजकीय पक्ष सक्रिय होणे हे जिवंत लोकशाहीचे लक्षण आहे. लोकशाहीत आघाड्या बनणे आणि तुटणे ही स्वाभाविक प्रक्रिया असून त्याचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजप हा 'परफॉर्मन्स ओरिएंटेड' पक्ष असून केंद्रातील अन् राज्यातील 'डबल इंजिन' सरकारच्या माध्यमातून झालेले महामार्ग, उड्डाणपूल आणि उज्ज्वला योजनेसारखे ऐतिहासिक प्रकल्प जनतेच्या पाठीशी आहेत. त्यामुळे जनता पुन्हा एकदा भाजपवरच विश्वास दाखवेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा
सर्व पहा