पावसाच्या दडीने राज्यातील झेंडू लागवडीला मोठा फटका

उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण : सत्तरीत ओलाव्याअभावी रोपे करपण्यास सुरुवात

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th September, 09:02 pm
पावसाच्या दडीने राज्यातील झेंडू लागवडीला मोठा फटका

गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याचा थेट परिणाम सत्तरी तालुक्यातील झेंडू लागवडीवर होऊ लागला आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या या पिकातील जमिनीची आर्द्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी रोपे कोमेजण्यास आणि करपण्यास सुरुवात झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुढील दोन दिवसांत पाऊस न पडल्यास झेंडू उत्पादनाला मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाऊस लांबल्यास झेंडू उत्पादनाला मोठा फटकासत्तरी तालुक्यात सुमारे एक लाख झेंडूच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे. मात्र, पावसाने दडी मारल्याने जमिनीतील ओलावा कमी होत असून कोवळी रोपे कोमेजण्यास आणि करपण्यास सुरुवात झाली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठी मागणी

गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. सजावट, पूजाविधी आणि तोरणांसाठी फुलांचा वापर होतो. यंदा चांगला दर मिळण्याच्या अपेक्षेने उत्पादकांनी नियोजनपूर्वक सुमारे एक लाख झेंडूच्या रोपांची लागवड केली होती. दहा दिवसांपूर्वी लागवड करताना पावसाळी वातावरण असल्याने रोपांची चांगली वाढ होण्याची अपेक्षा होती. मात्र, पावसाने विश्रांती घेतल्याने परिस्थिती अचानक बदलली आहे.

पावसावरच अवलंबून असलेले पीक

झेंडूची लागवड प्रामुख्याने पावसाळ्यात होत असल्याने उत्पादक स्वतंत्र पाणीपुरवठ्याची व्यवस्था करत नाहीत. हे पीक पूर्णपणे पावसावर अवलंबून असते. सध्या पावसाअभावी आणि वाढत्या उष्णतेमुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत आहे.

त्यामुळे झाडांच्या मुळांना पाणी न मिळाल्याने कोवळी रोपे करपून उत्पादकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वेळेवर पाऊस न पडल्यास रोपांची वाढ खुंटून फुलधारणेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

लागवडीवरील खर्च धोक्यात

जमीन मशागत, रोपांची खरेदी, खते आणि मजुरी यावर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. आता पीकच धोक्यात आल्याने हा खर्च वाया जाण्याची भीती आहे.

तसेच, पिकाला पाणी देण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केल्यास अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल, जो अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे.

पाऊस नसल्याने ‘कही खुशी, कही गम’

पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय टळून बाजारपेठा फुलल्या आहेत; मात्र दुसरीकडे शेतीला याचा मोठा फटका बसत आहे. पावसावर अवलंबून असलेल्या झेंडू उत्पादकांसाठी हे वातावरण ‘कही खुशी, कही गम’ असे ठरत आहे.

जर उत्पादनात मोठी घट झाली, तर स्थानिक बाजारात फुलांचा तुटवडा निर्माण होऊन ग्राहकांना महागड्या दराने फुले खरेदी करावी लागू शकतात.

पावसाअभावी इतर पिकांवरही परिणामाची शक्यता

कृषी अधिकाऱ्यांचे निरीक्षण

पावसाने हुलकावणी दिल्याने झेंडूच्या लागवडीवर दुष्परिणाम होत असल्याची माहिती स्थानिक कृषी अधिकारी विश्वनाथ गावडे यांनी दिली.

ते म्हणाले की, पाऊस आणखी लांबल्यास केवळ झेंडूच नव्हे, तर इतर पिकांवरही गंभीर परिणाम होऊ शकतो. यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची दाट शक्यता आहे, असे विश्वनाथ गावडे यांनी सांगितले.

पुढील दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाल्यास कोवळ्या रोपांना आधार मिळू शकेल; अन्यथा यंदाचा झेंडू हंगाम उत्पादकांसाठी आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकतो.

पुढील दोन दिवसांचा पाऊस निर्णायकसमाधानकारक पाऊस झाल्यास झेंडूच्या कोवळ्या रोपांना आधार मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पाऊस आणखी लांबल्यास उत्पादन घटण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या खर्चावरही संकट येऊ शकते.
हेही वाचा
सर्व पहा