पणजी : गणेशोत्सवादरम्यान गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी राज्याची अधिकृत जीवरक्षक संस्था 'दृष्टी मरीन'तर्फे राज्यातील ४७ प्रमुख विसर्जन स्थळांवर प्रशिक्षित जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. राज्य शासनाने नियुक्त केलेली ही यंत्रणा सर्व ठरलेल्या विसर्जन दिवशी, म्हणजेच १५, १८, २०, २२, २४ सप्टेंबर आणि ४ ऑक्टोबर रोजी ३५ समुद्रकिनारे आणि १२ अंतर्गत जलस्रोतांसह एकूण ४७ ठिकाणी आपले विशेष जीवरक्षक पथक रात्री उशिरापर्यंत तैनात ठेवणार आहे.
समुद्राचे प्रवाह आणि पाण्याचा अंदाज लक्षात घेऊन ठरवून दिलेल्या विसर्जन स्थळांवर भाविकांना मदत करण्याचे स्पष्ट निर्देश जीवरक्षकांना देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी नागरिकांसाठी स्वतः पाण्यात उतरणे असुरक्षित असू शकते, तिथे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर भाविकांच्या वतीने गणेशमूर्ती पाण्यात नेऊन सुरक्षितपणे विसर्जित करण्यासाठी जीवरक्षक स्वतः पुढे येतील. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी केवळ मुख्य प्रवेशद्वारांचाच वापर करावा, जिथे जीवरक्षक उपस्थित असतील, असा महत्त्वाचा सल्ला दृष्टी मरीनने दिला आहे. तसेच पाण्याचा प्रवाह उथळ वाटत असला तरी, विशेषतः अंधार पडल्यानंतर कुटुंबे आणि लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
प्रशासकीय नियोजनानुसार उत्तर गोव्यात कळंगुट, कांदोळी, वागातोर, हरमल, मांद्रे, केरी, आश्वे, मोरजी, बागा, सिंकेरी, हणजूण, मिरामार आणि शिरदोन या किनाऱ्यांवर जीवरक्षक व स्वयंसेवक उपस्थित राहतील. तर दक्षिण गोव्यात बायणा, बोगमालो, हॉलांत, माजोर्डा, उर्तोडा, बेताळभाटी, बाणावली, गालजीबाग, तळपण, वार्का, झालोर, केळशी, मोबोर, आगोंद, पाळोळे, पाटने, राजबाग आणि पोळे या किनाऱ्यांवर नियुक्ती केली जाईल.
समुद्रकिनाऱ्यांव्यतिरिक्त ग्रामपंचायती आणि पालिकांच्या मागणीनुसार म्हापसा-तार नदी, पर्रा-वेर्ला तळी, हळदणे तळी, बस्तोडा-गिरी विसर्जन स्थळ, पणजी फेरी धक्का, वाडे तळी, मोरजी तळी, कुंभारजुवा फेरी धक्का, बेती फेरी धक्का, बायणा खारेवाडा, बाणावली तळे, पणजी फोर पिलर आणि म्हापसा ग्रीन पार्क या १२ अंतर्गत जलस्रोतांवर स्थानिक प्रशासनाच्या मागणीनुसार प्रत्येकी २ ते ६ जीवरक्षक तैनात राहतील.
दृष्टी मरीनचे मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन अवस्थी यांनी सांगितले की, ठरवून दिलेल्या सर्व विसर्जन स्थळांवर आमची पथके भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देतील. समुद्र अद्याप पर्यटनासाठी बंद असल्याने नागरिकांनी जीवरक्षकांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे.


