नोकरदारांच्या भविष्याची मुख्य पुंजी असलेल्या पीएफ खात्याची माहिती मिळवणे आणि गरजेच्या वेळी पैसे काढणे आता अत्यंत सोपे होणार आहे. ईपीएफओच्या (EPFO) अधिकृत पोर्टलवर जाणे, पासवर्ड आठवणे, ओटीपीची वाट पाहणे आणि सर्व्हर डाऊनच्या समस्येला सामोरे जाणे या कोट्यवधी नोकरदारांच्या रोजच्या मनस्तापावर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने डिजिटल तोडगा काढला आहे. ईपीएफओ आपल्या सेवा पूर्णपणे हायटेक करत असून, थेट व्हॉट्सॲपवर (WhatsApp) या सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे ऑफिसच्या कामात असताना किंवा तातडीच्या वेळी पासबुक तपासण्यासाठी सायबर कॅफे किंवा लॅपटॉप उघडण्याची गरज उरणार नाही.
या नवीन प्रणालीअंतर्गत, ईपीएफओच्या अधिकृत आणि व्हेरीफाईड क्रमांकावर एक 'Hello' किंवा छोटा मेसेज पाठवून ही सेवा सक्रिय करता येईल. मेसेज पाठवताच चॅटबॉट (Chatbot) लगेच सक्रिय होऊन सदस्याला पीएफ खात्यातील सध्याचा शिल्लक बॅलन्स, जमा झालेले व्याज, अलीकडील व्यवहार आणि क्लेमची सद्यस्थिती (Claim Status) अवघ्या काही सेकंदांत मोबाईल स्क्रीनवर दाखवेल.
पैसे काढण्याच्या नियमांत मोठा दिलासा अन् UPI ट्रान्सफर
पैसे काढण्याच्या जुन्या किचकट नियमांमध्येही महत्त्वपूर्ण प्रशासकीय बदल करण्यात आले आहेत. गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी आता कोणतीही कमाल मर्यादा न ठेवता हक्काचे पैसे काढण्याची मुभा देण्यात आली आहे. याशिवाय मुलांच्या उच्च शिक्षणासाठी तब्बल १० वेळा, तर लग्नकार्य किंवा स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी ५ वेळा ॲडव्हान्स विड्रॉल करता येणार आहे.
विशेष म्हणजे, पैसे काढण्याची प्रक्रिया केवळ डिजिटल केली नसून, क्लेम मंजूर झाल्यानंतर मंजूर रक्कम थेट यूपीआय (UPI) प्रणालीद्वारे थेट बँक खात्यात हस्तांतरित करण्याची नवी सुविधा जोडली जात आहे. त्यामुळे विड्रॉल फॉर्म भरल्यानंतर पैशांसाठी आठवडे वाट पाहण्याचा काळ आता संपुष्टात येईल.
ऑटो-लिंक अन् जलद ऑटो-सेटलमेंट
नवीन नोकरीत रुजू झाल्यानंतर जुन्या कंपनीतून पीएफ ट्रान्सफर करण्यासाठी पूर्वी महिनोन्-महिने खेटे मारावे लागायचे. आता सेंट्रलाइज्ड डेटाबेसमुळे नवीन नोकरीत रुजू होताच जुना पीएफ आपोआप नव्या खात्याशी लिंक होणार आहे. तसेच छोट्या क्लेमसाठी ऑटो-सेटलमेंटची मर्यादा वाढवल्यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय (Human Intervention) क्लेम वेगाने मंजूर होणार आहेत. एका मेसेजवर पीएफ शिल्लक तपासण्यापासून ते थेट यूपीआयने पैसे खात्यात जमा करण्यापर्यंतची सर्व कामे घरबसल्या चुटकीसरशी पूर्ण होणार आहेत.


