बेळगाव : घरात मध्यरात्री फ्रीजचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू, दोन महिला गंभीर

बेळगावच्या चावट गल्लीत मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे फ्रीजचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत धामोणे कुटुंबातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
बेळगाव : घरात मध्यरात्री फ्रीजचा भीषण स्फोट; एकाच कुटुंबातील चौघांचा जळून मृत्यू, दोन महिला गंभीर

बेळगाव: गणेशोत्सवाच्या ऐन उत्साहात बेळगाव शहरात एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळ असलेल्या चावट गल्ली परिसरातील एका घरात मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित धामोणे कुटुंबाने सोमवारी दिवसभर उत्साहात गणेशोत्सव साजरा केला होता. रात्री सर्वजण झोपी गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घरात शॉर्टसर्किट झाले. त्यानंतर काही वेळातच घरातील फ्रीजचा जोरदार स्फोट होऊन आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण घराला वेढले. आग वेगाने पसरल्याने घरातील सदस्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही आणि ते आत अडकून पडले.

या दुर्घटनेत गजानन धमूने (६५), रोशन धमूने (२१), शारदा धमूने (४५) आणि भारती धमूने (५०) या चार जणांचा गंभीर भाजल्याने व गुदमरून जागीच मृत्यू झाला. तर प्रिया धमूने (२८) आणि गंगा धमूने (२५) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे चावट गल्ली परिसरात शोककळा पसरली असून पोलीस स्फोटाच्या अचूक कारणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा
सर्व पहा