म्हापसा : अल्पवयीन मुलाकडे वैध वाहनचालक परवाना नसतानाही त्याच्या ताब्यात दुचाकी दिल्याप्रकरणी दुचाकीच्या मालकाविरोधात म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलाने दुचाकी चालवताना पादचाऱ्याला धडक दिल्याने पादचारी गंभीर जखमी झाला तर अल्पवयीन चालकही जखमी झाला आहे.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास बार्देश येथील बस्तोडा गणेश विसर्जन स्थळाजवळ घडली. या प्रकरणी पोलीस हवालदार महेश मंगेश मयेकर यांनी राज्य सरकारच्या वतीने तक्रार दाखल केली.
तक्रारीनुसार, दुचाकी क्रमांक जीए-०३-एएन-५१५७ चा नोंदणीकृत मालक जाबिउल्ला जमाल अत्तार (४९, रा. ओर्दा, कांदोळी) याने आपल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला वैध वाहनचालक परवाना नसतानाही दुचाकी चालविण्यास दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलगा म्हापसा ते मोईराच्या दिशेने बस्तोडामार्गे दुचाकी चालवत होता.
दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवताना त्याने बस्तोडा येथील श्री गणेश विसर्जन स्थळाजवळ पादचारी मंतेश चव्हाण (३८, रा. कवळेकर सुपर मार्केटजवळ, पर्वरी) यांना धडक दिली. या अपघातात चव्हाण यांना गंभीर दुखापत झाली. तसेच अल्पवयीन दुचाकीस्वारालाही दुखापत झाली.
या प्रकरणी म्हापसा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १२५, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटर वाहन कायद्यातील कलम १८४, १८०, ३, ४, आणि १९२ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास म्हापसा पोलीस करीत आहेत.


