केपे येथे अडीच लाखांच्या चोरीचा तीन दिवसांत लागला छडा, १९ वर्षीय तरुणाला अटक

केपे पोलिसांनी तत्परता दाखवत ५० हजार रुपयांची रोकड आणि १.८० लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरीचा गुन्हा अवघ्या तीन दिवसांत उघडकीस आणत १९ वर्षीय तरुणाला अटक केली आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
केपे येथे अडीच लाखांच्या चोरीचा तीन दिवसांत लागला छडा, १९ वर्षीय तरुणाला अटक

केपे : येथे एका मोठ्या चोरीच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना अवघ्या तीन दिवसांत यश आले आहे. ५० हजार रुपयांची रोकड आणि सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला केपे पोलिसांनी अटक केली आहे. आर्यन अविनाश माने असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ११ सप्टेंबर २०२६ रोजी केपे पोलीस स्टेशनात चोरीचा अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला होता. घरातून मोठी रोकड आणि किमती दागिने चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने तपास करत १३ सप्टेंबर रोजी संशयित आरोपी आर्यन माने याला शोधून काढले आणि ताब्यात घेतले.

केपे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल सिद्धू राऊळ आणि पोलीस कॉन्स्टेबल वैभव पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली आहे. चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ७२ तासांच्या आत मुख्य आरोपीचा सुगावा लावून त्याला गजाआड केले. पोलीस सध्या आरोपीची कसून चौकशी करत असून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

हेही वाचा
सर्व पहा