पणजी : गोव्यात गणेश चतुर्थीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी राज्यभर भक्तीमय वातावरणात घरच्या व सार्वजनिक गणरायाचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची आकर्षक सजावट आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने शहरांसह ग्रामीण भागातील वातावरण उत्साहाने भारून गेले आहे.
घरोघरी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांत गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य दाखविण्यात आला. आरत्यांचे फड रंगले. सामुहीक प्रार्थना, फुगड्या, भजन, श्री गणेशाचा गजर, नामस्मरण इत्यादीने वातावरण भक्तीमय बनवले. गणेश चतुर्थीनिमित्त अनेक कुटुंबांनी आपल्या घरांत पारंपरिक पद्धतीने सजावट केली आहे. काही ठिकाणी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य देण्यात आले आहे.
गणरायाच्या आगमनासाठी घरातील लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वजण तयारीत सहभागी झाले. सोमवारी गणेशमूर्ती आणण्यासाठी सकाळपासूनच नागरिकांची लगबग पाहायला मिळाली. काही ठिकाणी सकाळी पावसानेही हजेरी लावल्याने उकाडा कमी होण्यास मदत झाली. काल पासून सुरू असलेला गणेशभक्तीचा उत्साह आज मंगळवारीही कायम होता.
गोव्यातील बाजारपेठांमध्येही चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी झाली. गणेशमूर्ती, फुले, पूजेचे साहित्य, सजावटीच्या वस्तू तसेच विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी नागरिकांची गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठांमध्ये गर्दी आहे. चतुर्थीनिमित्त घराघरांत मोदक, करंज्या आणि इतर पारंपरिक पदार्थांची रेलचेल सुरू आहे.
राज्यातील अनेक गावांमध्ये गणेशोत्सवाला विशेष पारंपरिक महत्त्व आहे. विविध ठिकाणी भजन, आरती आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक कुटुंबे एकत्र येत असल्याने सामाजिक आणि कौटुंबिक स्नेहाचे वातावरणही निर्माण झाले आहे.
आज दीड दिवसांच्या श्री गणपतींचे विसर्जन
आज मंगळवारी घरोघरी पुजलेल्या दीड दिवसांच्या श्री गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. मात्र, पाच, सात, नऊ, अकरा असे ठेवून घेतलेले व सार्वजनिक श्री गणपती असणार आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस श्री गणेश चतुर्थीचा उत्साह कायम असणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवांत कार्यक्रमांची रेलचेल
गोव्यातील कानाकोपऱ्यात असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांतही उत्सवी आणि उत्साही वातावरण आहे. विविध कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा यासाठी विविध ठिकाणी आवश्यक त्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. पुढील काही दिवस गोव्यात गणरायाच्या भक्तीचा आणि उत्साहाचा हा माहोल कायम राहणार आहे.
मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा!
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीयांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गोव्यात सुख, समृद्धी, भरभराट यावी आणि राज्याची सदैव सेवा करण्याची संधी मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.


