आठ वर्षांपासून घरात गणरायाची प्रतिष्ठापना; सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरले गोव्यातील 'हे' मुस्लिम कुटुंब

गोव्यातील कोरगाव येथील मुस्लिम धर्मीय पत्रकार मकबूल माळगीमणी यांनी गेल्या आठ वर्षांपासून स्वतःच्या घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करून सर्वधर्मसमभाव, माणुसकी आणि धार्मिक सौहार्दाचा एक अत्यंत सुंदर आदर्श समाजासमोर ठेवला आहे.

Story: गोवन वार्ता | प्रतिनिधी |
just now
आठ वर्षांपासून घरात गणरायाची प्रतिष्ठापना; सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरले गोव्यातील 'हे' मुस्लिम कुटुंब

कोरगाव : चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाचे आगमन राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात झाले आहे. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणपती बाप्पाच्या जयघोषाने वातावरण मंगलमय झाले आहे. अशा वातावरणात गोव्यातील पेडणे तालुक्यातील कोरगाव येथून सामाजिक ऐक्य, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश देणारी एक अत्यंत सकारात्मक घटना समोर आली आहे.

कोरगाव येथील स्थानिक मुस्लिम धर्मीय पत्रकार मकबूल माळगीमणी हे गेल्या आठ वर्षांपासून आपल्या स्वतःच्या घरात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करून पूर्ण श्रद्धेने गणेशोत्सव साजरा करत आहेत. केवळ शब्दांत सर्वधर्मसमभावाच्या गप्पा मारणाऱ्यांच्या काळात, त्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

बालपणीचे स्वप्न आणि पूर्वजांची परंपरा

मकबूल माळगीमणी यांना लहानपणापासूनच आपल्या घरी श्री गणरायाची स्थापना करण्याची तीव्र इच्छा होती. त्यांच्या पूर्वजांच्या काळातही गणेशपूजनाची परंपरा होती, परंतु कालांतराने ती खंडित झाली होती. लहान असताना ते वडिलांना विचारायचे की, आपल्या घरी गणपती कधी बसवायचा?" तेव्हा त्यांचे वडील सांगायचे, भाड्याच्या घरात गणपती ठेवता येत नाही; जेव्हा आपले स्वतःचे घर होईल, तेव्हा आपण नक्की गणपती बसवू.स्व तःचे घर उभारणीच्या या प्रवासात त्यांच्यावर अनेक संकटे आली, परंतु कुटुंबाची साथ आणि गावातील स्थानिक नागरिक परशुराम गावडे यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे स्वतःचे घर बांधण्याचे स्वप्न साकार झाले. स्वतःचे घर पूर्ण होताच त्यांनी बालपणीचे स्वप्न पूर्ण करत घरात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली.

"माणुसकी हाच खरा धर्म"

आपल्या या निर्णयामागील भावना व्यक्त करताना मकबूल माळगीमणी अत्यंत भावूक होऊन सांगतात, मी जेव्हा अत्यंत कठीण आणि संकटाच्या काळात होतो, तेव्हा माझ्या मदतीला कोणताही ठराविक धर्म नाही, तर 'माणूस' धावून आला. त्यामुळे माणुसकी हाच मी माझा एकमेव धर्म मानतो. मी कोणत्याही देवाबद्दल कधीही भेदभाव केला नाही आणि यापुढेही करणार नाही.

आपल्या भूतकाळातील संघर्षाची आठवण करून देताना ते म्हणाले, "जेव्हा माझ्या घरात वीज नव्हती आणि अंधार असायचा, तेव्हा मी चर्चमधील मेणबत्त्या आणून घरात उजेड केला. जेव्हा खायला अन्न नव्हते, तेव्हा देवळातील प्रसाद खाऊन दिवस काढले. त्यामुळे माझ्यासाठी सर्व देव आणि सर्व धर्म सारखेच आहेत. आज मी जे काही आहे, ते सर्व धर्मांच्या लोकांच्या पाठिंब्यामुळे आहे. मग मी देवांमध्ये आणि माणसांमध्ये भेदभाव का करू?"

समाजासाठी एक प्रेरणादायी संदेश

सध्याच्या काळात राजकीय किंवा सामाजिक व्यासपीठांवरून सर्वधर्मसमभावाची भाषणे दिली जातात, परंतु प्रत्यक्ष कृती करणारे खूप कमी असतात. अशा परिस्थितीत माळगीमणी कुटुंबाने जपलेली ही परंपरा गोव्याच्या धार्मिक सौहार्द आणि 'गोयंकार Pon' (गोवेकरपण) या संकल्पनेला अधिक मजबूत करते. गणपती पूजनामागे कोणताही आव आणणे किंवा प्रसिद्धी मिळवणे हा उद्देश नसून, सर्वधर्मसमभाव आणि माणुसकीचा संदेश देणे हाच आपला मुख्य हेतू असल्याचे ते सांगतात.

जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस आणि माणुसकीला प्राधान्य देणाऱ्या या उपक्रमाचे राज्यभरातून कौतुक होत आहे. कोरगावमधील हे माळगीमणी कुटुंब केवळ धार्मिक सण साजरा करत नसून, आजच्या तरुण पिढीला बंधुभाव आणि ऐक्याची खरी व्याख्या आपल्या वर्तनातून शिकवत आहे.

हेही वाचा
सर्व पहा