नवी दिल्ली : यंदाच्या वर्ष अखेरीस भारताच्या किनारपट्टीवर चक्रीवादळांचा धोका वाढण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) हंगामी अंदाजानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२६ या कालावधीत भारतीय महासागरात सुमारे तीन उष्णकटि बंधीय चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता आहे. या वादळांची एकूण तीव्रता दीर्घकालीन सरासरीपेक्षा लक्षणीय अधिक राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
वादळांची ताकद ८३ टक्क्यांनी अधिक
ISROच्या अंदाजानुसार, या कालावधीतील चक्रीवादळांची तीव्रता ( Power Dissipation Index (PDI)) सुमारे 13.06 × 10⁶ knots³ राहू शकते. हा आकडा मागील ४४ वर्षांच्या सरासरीपेक्षा सुमारे ८३ टक्के अधिक आहे. त्यामुळे यंदाचा पोस्ट-मान्सून चक्रीवादळ हंगाम तुलनेने अधिक तीव्र ठरण्याची शक्यता आहे.या अंदाजासाठी जानेवारी ते ऑगस्टदरम्यानची समुद्र आणि वातावरणाशी संबंधित विविध आकडेवारी तसेच दीर्घकालीन ऐतिहासिक हवामानविषयक माहितीचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र, या मॉडेलमधून कोणते चक्रीवादळ नेमके कुठे धडकणार किंवा त्याची अचूक तारीख काय असेल, हे निश्चित सांगता येत नाही.
किनारपट्टीवरील यंत्रणांना सतर्कतेचा इशारा
भारतीय महासागरात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा समावेश होतो. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांना आगामी काळात विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि सागरी क्षेत्राशी संबंधित विभागांसाठी हा अंदाज पूर्वतयारीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.मच्छीमारांना समुद्रातील परिस्थितीनुसार सूचना देणे, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे, किनारी भागातील संवेदनशील ठिकाणांची पाहणी करणे आणि आवश्यकतेनुसार बचावकार्याची तयारी ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे. ISROच्या MOSDACने ८ सप्टेंबर २०२६ रोजी भारतीय महासागरातील चक्रीवादळांच्या हंगामी अंदाजासंदर्भात अहवाल प्रसिद्ध केला आहे.


