कॅसिनो संचालकावर गोळीबार प्रकरणी मुख्य शूटरला चेन्नईत अटक

गुन्हे शाखा, चेन्नई पोलिसांची कारवाई : आतापर्यंत सहा आरोपींना बेड्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th September, 10:05 pm
कॅसिनो संचालकावर गोळीबार प्रकरणी मुख्य शूटरला चेन्नईत अटक

पर्वरी येथील ‘निओ मॅजेस्टिक’ कॅसिनोचे संचालक श्रीनिवास नायक यांच्यावरील गोळीबार प्रकरणातील मुख्य शूटरला गोवा गुन्हे शाखा आणि चेन्नई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अटक करण्यात आली आहे. चेन्नईतील लाईट हाऊस पोलीस स्थानकाच्या हद्दीतून मुख्य आरोपीसह त्याला आश्रय देणाऱ्या दुसऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले असून, या प्रकरणात आतापर्यंत एकूण सहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुख्य शूटरसह आश्रयदात्याला चेन्नईत अटकअर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार याला चेन्नई पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले. तसेच त्याला आश्रय देणारा पवन हरी सिंग सौर यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्य शूटर अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार (४९, रा. मुंबई, मूळ तामिळनाडू) याला चेन्नई पोलिसांच्या मदतीने जेरबंद करण्यात आले. तसेच त्याला आश्रय देणारा पवन हरी सिंग सौर (१९, रा. मुंबई, मूळ मध्य प्रदेश) यालाही पोलिसांनी अटक केली आहे.

सोशल मीडियावर अण्णा नदार याने एक व्हिडिओ जारी केला होता. त्या आधारे गुन्हे शाखेने त्याचा ठावठिकाणा शोधून काढला आणि लाईट हाऊस पोलिसांच्या साहाय्याने ही कारवाई केली.

व्हिडिओतून केले गंभीर आरोप

अटक होण्यापूर्वी अण्णा नदार याने व्हिडिओद्वारे या गोळीबार नाट्यामागे खुद्द फिर्यादी श्रीनिवास नायकच असल्याचा दावा केला होता. या कथित हल्ल्यासाठी नायक यांनी आपल्याला १० कोटी रुपयांचे आमिष दाखवले होते आणि एका मीटरच्या अंतरावरून झाडलेली गोळी न लागणे शक्य आहे का, असा सवाल करत या प्रकरणात आपल्याला वापरले गेल्याचा गंभीर आरोप त्याने केला होता.

पोलिसांकडून दाव्यांचे खंडन

मुख्य शूटर अण्णा नदार याने जारी केलेल्या त्या व्हिडिओतील सर्व दावे खोटे असून, पोलीस तपास तसेच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने केलेला हा प्रयत्न आहे, असे पोलिसांनी सांगितले. तरीही सर्व अनुषंगाने तपास सुरू आहे.

२८ ऑगस्टचा थरार

१) २८ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ८.४७ वाजता हॉटेल निओ मॅजेस्टिकचे संचालक श्रीनिवास नायक बाहेर पडत असताना, दबा धरून बसलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन राऊंड गोळीबार केला होता.

२) नायक यांच्या अंगरक्षकांनी प्रतिकारात्मक तीन राऊंड फायर केल्यावर ते फरार झाले होते. या हल्ल्यातून नायक बालंबाल बचावले.

३) या घटनेनंतर पर्वरी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), १२५, ३(५) आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ३ व २७ अन्वये गुन्हा नोंदवला आणि नंतर राज्य सरकारने हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला.

अटकसत्र अन् पुढील तपास

गुन्हे शाखेने १० सप्टेंबर रोजी प्रथम तिघांना अटक केली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून १२ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातून नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बाबू ऊर्फ इसार अली (३५, रा. बहराइच, उत्तर प्रदेश) या संशयित शूटरला अटक करण्यात आली.

या प्रकरणात काझू अलाउद्दीन शेख (२८, रा. मुंबई), इसरार अली अहमद (२५, रा. उत्तर प्रदेश), सूरज उपेंद्र आचार्य (३६, रा. बोरीवली, मुंबई), बाबू ऊर्फ इसार अली (३५), अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार (४९) आणि पवन हरी सिंग सौर (१९) अशा सहा जणांना आतापर्यंत अटक झाली आहे.

प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निखिल पालेकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

अशी जुळली कटाची साखळी

सन २०१४ मध्ये बाबू हा कारागृहात असलेल्या आपल्या भावाला भेटण्यासाठी गेला असता त्याची ओळख अण्णा नदार याच्याशी झाली होती. पुढे २०२४ मध्ये नवी दिल्लीतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातून सुटल्यानंतर अण्णा याने गोव्यात ज्यूस आणि वडापावचा गाडा सुरू केला होता.

त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये बाबू गोव्यात अण्णाकडे कामाला आला आणि मालकाच्या सांगण्यावरून तो या हल्ल्याच्या कटात सामील झाला होता.

प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटकमुख्य शूटर अर्पुथराज ऊर्फ अण्णा पुलराज नदार आणि त्याला आश्रय देणारा पवन हरी सिंग सौर यांच्या अटकेनंतर या प्रकरणातील अटक झालेल्या आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे.
हेही वाचा
सर्व पहा